Crime News : नवी मुंबईत ( Navi Mumbai  ) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाळणा घरात ( Day Care Center ) अवघ्या 16 महिन्याच्या बाळाला बेदम मारहाण करण्यात आली. वाशी शहरातील स्मार्ट थॉट्स डे केअर सेंटरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. बाळाला मारहाण केलेला संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या प्रकरणी पालकांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी याबाबत एनसी दाखल केली आहे. परंतु, या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करून दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी पालकांनी केली आहे. 
 
बाळाला मारहाण करण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, स्मार्ट थॉट्स डे केअर सेंटरमध्ये 16 महिन्याचा चिमुकला खुर्चीवर बसला आहे. त्यावेळी टेबलावर त्याच्या समोर जेवणाचं ताट ठेवले जातं. यावेळी बाळ त्या ताटातील चमचा घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावेळी तेथील आयाने त्याच्या थोबाडीत मारले आणि खुर्चीवरून उचलून बाजूला ठेवले. बाळाला मारल्याने ते रडत असल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे. घरी आल्यावर देखील बाळाचे रडणे थांबत नसल्याने पालकांना संशय आला. त्यामुळे पालकांनी डे केअर सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेज पाहण्याची मागणी केली. त्यानुसार सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर हे प्रकार समोर आला. सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर पालकांनी या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. 


दोन आठवड्यापासून बाळ झोपत नाही


मारहाण करण्यात आलेले बाळ गेल्या दोन आठवड्या पासून रात्री झोपत नाही. रोज रात्री ते रडत असल्याने या बाळाला असेच मारले जात असल्याचा संशय पालकांना आला. त्यामुळेच पालकांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले आणि त्यानंतर ही घटना समोर आली आहे. पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणी फक्त एनसी दाखल केली आहे. परंतु, पालकांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 


'अशी' उघड झाली घटना 


दरम्यान, ही घटना समोर आल्यानंतर या पाळणाघरातील इतर दिवसांचे सीसीटीव्ही तपासण्यात आले नाही. पालकांनी तक्रार केल्यानंतर त्यांच्या मोबाईलमध्ये असलेले सीसीटीव्ही कनेक्शन बंद करण्यात आले आहे. या प्रकरणी एफआयआर दाखल करून अधिक चौकशी केली तर इतर बाळांनाही होत असलेली मारहाण समोर येईल. यासाठी संबंधितांवर गुन्हा दाखर करण्यात यावा अशी मागणी पालकांनी केली आहे. 


महत्वाच्या बातम्या


Aurangabad Crime News : मुलं सांभाळणं असह्य झाले, चिडचिड व्हायची; निर्दयी आईकडूनच दोन चिमुकल्यांची हत्या