Dhule Politics : धुळे (Dhule) शहराचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे (Rajvardhan Kadambande) यांचे चिरंजीव तथा युवा सेनेचे सहसचिव ठाकरे गट यशवर्धन कदमबांडे यांनी शिवसेनेला (Shivsena) जय महाराष्ट्र केला आहे. कौटुंबिक कारणामुळे भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे यशवर्धन कदमबांडे यांनी सांगितले.


अवघ्या चार महिन्यापूर्वी म्हणजेच 20 ऑक्टोंबर रोजी यशवर्धन कदमबांडे (Yashwardhan Kadambande) यांनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या (BJP Yuva Morcha) प्रदेश सदस्य पदाचा राजीनामा दिला.  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे (Aditya Thackrey) आणि वरूण सरदेसाई असावी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर युवा सेनेत मोठी जबाबदारी ही यशवर्धन कदमबांडे यांच्यावर देण्यात आली होती. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी युवासेनेचे सहसचिव पद देऊन पक्ष विस्ताराची धुरात त्यांच्या खांद्यावर सोपवली होती.


माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी मात्र आपण भारतीय जनता पक्षातच राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर यशवर्धन कदमबांडे यांच्या शिवसेना प्रवेशानंतर धुळे जिल्हा शिवसेनेला राजकारणातील मातब्बर चेहरा मिळाला आणि त्यांनी आपल्या शिवसेनेतील प्रवासाला धडाकेबाज सुरुवात केली आणि धुळे शहरातील भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला होता. मात्र त्यांच्या या चार महिन्यांच्या प्रवासा नंतर आपले वडील माजी आमदार राजवर्धन कदमबांडे हे भारतीय जनता पक्षात असल्यामुळे आपण पुन्हा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे देखील यशवर्धन कदमबांडे सांगितले आहे.


Maharashtra News Nashik News : चार महिन्यांतच माघारी 


दरम्यान धुळे महापालिकेत एकहाती सत्ता असूनही कामे होत नसल्याने भाजपमध्येच असलेला असंतोष, सत्तांतरानंतर शिवसेनेचे शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन भाग झाले. त्यातच एमआयएम विरुध्द भाजप यांच्यात अधुनमधून होणारे वादविवाद असे शहराचे राजकारण सुरू होते. त्याचवेळी भाजपमधील यशवर्धन कदमबांडे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला. मात्र अल्पावधीतच त्यांनी पुन्हा भाजपमध्ये घर वापसी केली आहे. ऑक्टोबरमध्ये ठाकरे गटात प्रवेश केला होता, आता चार महिनेच झाले असताना भाजपमध्ये पुन्हा माघारी फिरले आहे. 


Maharashtra News Nashik News : कोण आहेत यशवर्धन कदमबांडे?


यशवर्धन कदमबांडे हे धुळ्याचे भाजपचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांचे चिरंजीव आहेत. शिवाय कदमबांडे कुटुंबीयांकडे धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे चेअरमन पदही आहे. राजवर्धन कदमबांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून राजकीय क्षेत्रात पदार्पण केले होते. 2019 मध्ये राजवर्धन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. छत्रपती शाहू महाराजांचे घराणे म्हणून कदमबांडे परिवाराला धुळ्याच्या राजकारणात मोठा मान आहे. राजवर्धन कदमबांडे यांनी गेल्या काही वर्षांमध्ये सामाजिक कार्याच्या माध्यमातून आपला जनसंपर्क वाढवत नेला. तरुण कार्यकर्त्यांमध्ये राजवर्धन कदमबांडे हे विशेष लोकप्रिय आहेत.