Nashik Crime News नाशिक : रेल्वेत (Railway) नोकरी (Job) लावून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेसह 62 जणांची 6 कोटी 2 लाख रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात (Upnagar Police Station) सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी वीरेश राजेश वाबळे (रा. नर्मदा हौसिंग सोसायटी, लोखंडे मळा, जेलरोड, नाशिकरोड) हे जिम ट्रेनर म्हणून काम पाहतात. दि. 15 ते 18 डिसेंबर 2021 या कालावधीत वाबळे हे सायंकाळच्या वेळी घरी असताना त्यांचे परिचित शैलेंद्र महिरे यांचा फोन आला.
रेल्वेत नोकरीला लावून देण्याचे दाखवले आमिष
त्यावेळी महिरे यांनी त्यांच्या फोनवरून आरोपी रमणसिंग ऊर्फ विशालसिंग (रा. कोलकाता) याच्याशी व्हॉट्सअॅप कॉलवरून बोलणे करून दिले. रमणसिंग याने महिरे यांच्या मुलाला रेल्वेत नोकरीला लावून दिले होते. त्यामुळे वाबळे यांचा रमणसिंग याच्यावर विश्वास बसला. रमणसिंग याने वाबळे यांना त्यांच्या पत्नीस रेल्वेमध्ये नोकरीस लावून देतो, असे आमिष दाखविले.
62 जणांकडून तब्बल 6 कोटी उकळले
या कामासाठी रमणसिंग याने वाबळे यांच्याकडून प्रथम आठ लाख रुपये घेतले, तसेच या प्रक्रियेदरम्यान आरोपी रमणसिंग (रा. कोलकाता), निरज सिंग (रा. टाटानगर, झारखंड), ऋतूराज पाटील ऊर्फ हेमंत हनुमंत पाटील (रा. येडेमच्छिंद्र, ता. वाळवा, जि. सांगली), राजेंद्र सिंग (रा. कोलकाता), अंशुमन प्रसाद (रा. रांची, झारखंड), संदीप सिंग (रा. रांची, झारखंड) व जैद अली (रा. वाशी, नवी मुंबई) यांनीही वाबळे यांच्या पत्नीस भारतीय रेल्वेत नोकरी लावून देतो, असे आमिष दाखविले. या सर्व आरोपींनी भारतीय रेल्वेचे बनावट व खोटे लेटरहेड, कागदपत्रे, शिक्के बनवून वाबळे यांच्याकडून वेळोवेळी रेल्वेतील नोकरी कायम करण्याकरिता एकूण 11 लाख रुपये घेतले, तसेच इतर 62 जणांकडून नोकरी लावून देण्याच्या आमिषाने एकूण 6 कोटी 2 लाख 32 हजार रुपयांची फसवणूक आहे.
सात जणांविरोधात गुन्हा दाखल
हा प्रकार दि. 15 डिसेंबर 2021 ते 13 जून 2024 यादरम्यान जेलरोड येथे फिर्यादी वाबळे यांच्या घरी घडला. आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर उपनगर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कोल्हे करीत आहेत.
आणखी वाचा
Nashik Crime : स्टॉक, आयपीओ घेण्यास भाग पाडत तरुणांना लाखोंचा गंडा, नाशिकमधील धक्कादायक प्रकार