Nashik Crime News नाशिक : विविध कंपन्यांचे स्टॉक (Stock) व आयपीओ (IPO) घेण्यास भाग पाडून वेगवेगळ्या खात्यांत पैसे जमा करण्यास लावून अज्ञात भामट्यांनी दोन तरुणांची सुमारे 79 लाख रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात (Cyber Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी व त्याचा साक्षीदार या दोन तरुणांशी वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप क्रमांकधारक आरोपींनी संपर्क साधला. नंतर या दोन तरुणांना स्टॉक डिसेक्शन ग्रुप व मोमेंटम स्टॉक कम्युनिटी अशा नावांनी स्थापन केलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी होण्यास भाग पाडले. त्यानंतर संशयित आरोपींनी अप्पर सर्किटच्या स्टॉकबद्दल फिर्यादी व त्याच्या साक्षीदाराला वेळोवेळी माहिती दिली. त्यांचा विश्वास संपादन करून आरोपींनी त्यांच्या कंपनीच्या बनावट कर्मा कॅपिटल ट्रेडिंग, व्हाईट व यांसारख्या प्लॅटफॉर्मवर दोघा तरुणांना खाते सुरू करण्यास भाग पाडले.
स्टॉक, आयपीओ घेण्यास भाग पाडत तरुणांना लाखोंचा गंडा
कालांतराने या अॅपवर विविध कंपन्यांचे स्टॉक व आयपीओ घेण्याकरिता आरोपींनी दिलेल्या विविध बँकांच्या खात्यांवर फिर्यादी व साक्षीदार यांना 7 लाख 15 हजार इतकी रक्कम गुंतविण्यास सांगितली. त्यानुसार फिर्यादी व साक्षीदार यांनी दि. 15 सप्टेंबर 2023 ते दि. 15 मार्च 2024 या कालावधीत इंटरनेट, फोन व बँक खात्यांद्वारे वेळोवेळी 78 लाख 78 हजार 600 रुपये इतकी रक्कम आरोपींनी सांगितल्याप्रमाणे जमा केली. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात रकमेची गुंतवणूक करूनही अपेक्षित फायदा होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. या प्रकरणी फसवणूक झालेल्या तरुणांनी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
वीज चोरी प्रकरणी दोन गुन्हे दाखल
शहरातील कुमावतनगर व निलगिरी बाग परिसरात 23 हजार रुपयांची वीजचोरी करणाऱ्या दोन महिलांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वीजचोरीची पहिली घटना कुमावतनगर येथे घडली. अनिता क्षीरसागर (रा. कुमावतनगर, पेठ रोड, पंचवटी) यांनी घराच्या समोरील पिलरमध्ये दोन फुटांची कॉपर वायर वापरून काळ्या रंगाची टू कोअर आर्म केबल वापरून घरगुती कारणासाठी अनधिकृतपणे वीज वापरून 1 हजार 117 युनिटची वीजचोरी करून महावितरण कंपनीचे 16 हजार 600 रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरी कारवाई निलगिरी बाग परिसरात करण्यात आली.निर्मला कमलेश श्रीवास्तव (रा. निलगिरी बाग झोपडपट्टी, पंचवटी) या महिलेने घरगुती कारणासाठी घराच्या समोरील पिलरवरून 285 युनिटची वीजचोरी करून महावितरणचे 6 हजार 325 रुपयांचे आर्थिक नुकसान केले म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
इतर महत्वाच्या बातम्या
Nashik Crime : पत्नी सोडून गेल्याने पती निराश, दारूच्या नशेत पतीनं असं काही केलं की पोलीसही चक्रावले
Nashik Crime : सातपूर आयटीआयच्या माजी प्राचार्यांचा कारनामा, बनावट बिले सादर करत केला लाखोंचा घोटाळा