Nashik Crime News नाशिक : शेअर मार्केटचे आमिष नाशिकच्या एका व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले आहे. शेअर मार्केट ट्रेडिंगमधून (Stock market trading) चांगल्या आर्थिक परताव्याचे आमिष दाखवून शहरातील व्यावसायिकास तब्बल तीन कोटी 70 लाखांना गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी नाशिक सायबर पोलिसात (Nashik Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर भामट्यांनी नाशिक (Nashik) येथील एका व्यावसायिकास गेल्या महिन्याभरापासून व्हॉटसॲपवर एका ग्रुपमध्ये ॲड केले होते. त्यावर शेअर मार्केट ट्रेडिंगविषयी अधिकृत वाटेल अशी माहिती दिली जात होती. शेअर ट्रेडिंगमध्ये आर्थिक गुंतवणूक केल्यास मोठा परताव्याचे आमिष या व्यावसायिकाला दाखवण्यात आले होते.
साडेतीन कोटी गुंतवा, साडेसात मिळतील म्हणत फसगत
व्यावसायिकाला संशयितांनी साडेतीन कोटी गुंतवल्यास तुम्हाला थेट साडेसात कोटी मिळतील, अशी स्कीम सांगितली. आम्हीही असेच पैसे गुंतविले आहेत. त्याचा आम्हाला इतक्या रुपयांचा फायदा झाला आहे. हे खात्रीशीर आहे. बिनधास्त पैसे टाका अन् कमवा, असे मेसेज व्यावसायिकाला करण्यात आले. यामुळे व्यावसायिकाने सायबर भामट्यांवर विश्वास टाकला आणि त्या स्कीममध्ये पैसे गुंतवले. त्यानंतर साडेसात कोटी रुपये काढताना व्यावसायिकाला अडचण आली. त्यामुळे व्यावसायिकाच्या मुलाने या अॅपची माहिती घेतली. त्यावेळी मुलाला आपल्या वडिलांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर व्यावसायिकाने तत्काळ सायबर पोलिसात धाव घेतली आणि आपली आपबिती पोलिसांना सांगितली. त्यानुसार ब्लॅकरॉक कॅपिटल सिक्युरिटीज मार्केट पुलअप टीम नावाचा व्हाट्सअॅप ग्रुप व त्यावरील क्रमांक 916300626686, 9482347361, 9417418197, अँजल वन कस्टमर केअर या नावाच्या ग्रुपमधील व्हाटस्अॅप क्रमांक 9226156675, 9472263175, 918762699376, 918235835947 आणि मेलिस्सा तसेच ऑनलाइन पद्धतीने पैसे वर्ग झालेले बँक खातेधारक या सायबर भामट्यांविरोधात नाशिक सायबर पोलिसात गुन्हा दाखल केला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख हे तपास करीत आहेत.
पिंपळगावला अॅक्सिस बँकेची फसवणूक
पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) येथील अॅक्सिस बँकेच्या (Axis Bank) शाखेत तब्बल साडेतीन कोटींची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला आहे. बनावट डिमांड ड्राफ्ट भरून त्याचे पैसे काढून घेणारा संशयित आरोपी एस. के. ट्रेडिंगचे संचालक अनिकेत श्रीनिवास मुदंडा (रा. चिंचखेड रोड, महेशनगर, बालाजी मंदिराजवळ, पिंपळगाव बसवंत) याच्याविरुद्ध पिंपळगाव पोलीस ठाण्यात (Pimpalgaon Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
संभाजीनगरच्या गरुडझेप अकॅडमीत आणखी एक आत्महत्या, पोलिसांच्या छापेमारीत मोठा खुलासा