Nandurbar Crime News : शहादा (Shahada) शहरातील तापी रेसिडेन्सी जवळ कौटुंबिक वादातून अल्पवयीन नातवाने आजोबांचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दशरथ राजे (60) असे मयताचे नाव आहे. ते रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास शतपावली करण्यासाठी गेले असता नातवाने त्यांच्या मानेवर चाकूने वार केले. यामुळे दशरथ राजे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जातानाच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी (Police) दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.  


याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार (Nandurbar News) जिल्ह्यात शहादा ते शिरूड रस्तालगत तापी रेसिडेन्सी रहिवासी निवास वसाहत आहे. या परिसरात मयताचा मुलगा राहुल दशरथ राजे हे ट्रॅक्टर मॅकनिकसह राहतात. राजे कुटुंबाचे नातेवाईक शहरातील जुना प्रकाशा रोड लगत मिरा नगर भागात राहतात. त्यांचे अनेक दिवसांपासून कौटुंबिक वादविवाद सुरु होते. 


नातवाने केली आजोबांची हत्या


दशरथ शंकर राजे (60) हे रविवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे शतपावलीसाठी घराबाहेर पडले. यावेळी दशरथ राजे यांचा अल्पवयीन नातू आणि एक युवक दुचाकीवर त्यांच्या जवळ आले. नातवाने दशरथ राजे यांच्या गळ्यावर धारेधार चाकूने सपासप दोन-तीन वार करीत तेथून पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच दशरथ राजे यांचा मुलगा राहुल राजे व इतर नागरिक घटनास्थळी दाखल झाले. त्यांना उपचारासाठी खासगी वाहनातून रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना गंभीर जखम झाल्याने त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. 


चार तासात संशयितांना बेड्या 


या प्रकरणी पोलिसांनी कसून तपास करत अवघ्या चार तासात अल्पवयीन नातवासह एक अल्पवयीन युवकाला ताब्यात घेतले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतापसिंह राजपूत यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक राजन मोरे करीत आहेत. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Nandurbar :गावातील दारूबंदीसाठी लाडक्या बहीणींचा पुढाकार; नंदुरबारच्या शहादा तालुक्यात थेट मतदान


धक्कादायक! चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने नाशिकमध्ये मोठा अपघात, तिघांना चिरडत बस थेट चौकशी कक्षावर धडकली