Nashik: गेल्या महिन्यात बँकेच्या घोटाळ्यातले 125 कोटी व्होट जिहादसाठी वापरले असल्याचा दावा करणारे भाजप नेते व माजी खारदार किरीट सोमय्या उद्या मालेगाव दौऱ्यावर येत आहे. मालेगाव (Malegaon) येथील नामको बँकेच्या (Merchant Bank) शाखेत बेरोजगार तरुणांच्या खात्यांवरून 125 कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. हे पैसे 'व्होट जिहाद'साठी वापरल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला होता. यानंतर ईडी, सीबीआय, रिझर्व्ह बँक आदी ठिकाणी किरीट सोमय्या यांनी तक्रार देत चौकशीची मागणी केली होती.
बँक फसवणूक प्रकरणी बँकांना भेटी
भाजप नेते व माजी खारदार किरीट सोमय्या उद्या मालेगाव दौऱ्यावर येत आहे. मालेगावातील बँक फसवणूक प्रकरणी अपर पोलिस अधिक्षकांची भेट घेणार असून ज्या बँकेत फसवणुकीचा प्रकार समोर आला त्या नाशिक मर्चंट बॅंक व बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांना भेटी देणार आहे.त्यानंतर फसवणूक झालेल्या तरुणांची देखील भेट घेऊन दुपारी 3 वाजता पत्रकार परिषदही घेणार आहेत.नोव्हेंबर महिन्यातही सोमय्या यांनी मालेगावला भेट देत मालेगाव बँक फसवणुकीतील रक्कम व्होट जिहादसाठी वापरल्याचा आरोप केला होता.त्यानंतर मालेगावमध्ये ईडीचे छापे पडले होते. त्यामुळे सोमय्या यांच्या मालेगाव दौरा महत्वाचा मानला जात आहे.
ईडीचे छापे अन् 'व्होट जिहाद'
याप्रकरणात ईडीने मुंबईसह अहमदाबाद येथे सात ठिकाणी छापे टाकून 13.50 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. आता किरीट सोमय्या यांनी ट्विट करत हे संपूर्ण प्रकरण व्होट जिहादशी संबंधित असल्याचा दावा पुन्हा एकदा केला आहे. मालेगाव व्होट जिहाद घोटाळा (Malegaon Vote Jihad Scam) 1000 कोटींचा असल्याचे त्यांनी म्हटले होते. लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत देखील 'व्होट जिहाद'चा मुद्दा चर्चेत आला होता. या मुद्द्याला विरोध करण्यासाठी भाजपने एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे असा नारा दिला होता. विधानसभेच्या निकालानंतर मालेगाव व्होट जिहादप्रकरणी ईडीकडून सात ठिकाणी छापेमारी करण्यात आल्याची माहिती किरीट सोमय्यांनी दिली होती.