सातारा : उल्हासनगरमध्ये राहत असलेल्या दाम्पत्याने काही राजकीय व्यक्तींना कंटाळून आत्महत्या केली. नंदकुमार ननावरे (Nandkumar Nanavare) आणि उज्जवला ननावरे यांनी 1 ऑगस्ट रोजी गच्चीवरुन उडी मारत आपलं जीवन संपवलं. या आत्महत्येला अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर (Balaji Kinikar) यांचे पीए जबाबदार असल्याचा आरोप आहे. नंदू ननावरे यांचा भाऊ धनंजय ननावरे यांनी योग्य तपास होत नसल्याने बोट कापून घेतलं आहे. भाऊ आणि वहिनीच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्यांवर कारवाई होत नसल्यानं धनंजय यांनी कॅमेऱ्यासमोर आपलं बोटं कापलं, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले असून चार ते पाच जणांना अटक करण्यात आली आहे. 


नंदकुमार ननावरे यांच्या भावाचं नेमकं म्हणणं काय?


नंदू ननावरे यांचा भाऊ धनंजय ननावरे यांनी प्रशासनावर रोख धरला आहे. ते म्हणतायत, "माझा भाऊ आणि वहिनीने आत्महत्या केली. आत्महत्या करण्याआधी त्यांनी व्हिडीओ बनवून आरोपींची नावं घेतली तरी देखील कोणताही तपास झाला नाही. 1 तारखेला माझ्या भावाने आत्महत्या केली. 18 तरखेपर्यंतही म्हणावा असा तपास झाला नाही, म्हणून मी बोट कापून घेतलं आहे."


या राजकीय नेत्यांपासून ननावरे कुटुंबाला धोका?


पुढे धनंजय ननावरे म्हणाले, "आरोपींची नावं माझ्या भावाने व्हिडिओत घेतली आहेत. त्यामध्ये खासदार रणजित नाईक निंबाळकर, संग्राम निकाळजे यांची नावं आहेत. या राजकीय पुढाऱ्यांपासून माझ्या कुटुंबियांना धोका आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि आम्हाला न्याय मिळावा, ही आमची मागणी आहे."


"न्याय मिळत नाही तोपर्यंत एक-एक अवयव कापणार"


नंदू ननावरे यांच्या भावाने बोट कापून घेतल्यावर पोलिसांनी 4 जणांना पकडल्याची माहिती देखील पोलिसांनी त्यांच्या भावाला फोनवरून दिली. तर जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी शरीराचा एक एक अवयव कापणार आणि फडणवीसांना पाठवणार असल्याचंही नंदू ननावरे यांचे भाऊ धनंजय ननावरे यांनी म्हंटलं आहे.


आतापर्यंत कोणा-कोणाला अटक?


नंदू ननावरेंच्या भावाने बोट कापून घेतल्यानंतर प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. ठाणे क्राईम ब्रांचने चार ते पाच जणांना अटक केली आहे. यात शिवसेना आमदार बालाजी किणीकर यांचे स्वीय सहाय्यक (पीए) शशिकांत साठे, पप्पू कलानी यांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते कमलेश निकम, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी नरेश गायकवाड यांच्यासह आणखी दोन ते तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. माढाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचाही ननावरे यांच्या व्हिडीओत उल्लेख आहे, त्यामुळे ननावरे आत्महत्या प्रकरण काय वळण घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.