Ulhasnagar: उल्हासनगर कॅम्प नंबर 4 येथील आशेळेपाडा परिसरात राहणारे नंदकुमार ननावरे यांनी मंगळवारी (1 ऑगस्ट) आपल्या पत्नीसह आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दाम्पत्याच्या आत्महत्येचं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. नंदू ननावरे हे अंबरनाथ विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांचे खाजगी स्वीय सहाय्यक असल्याचं बोललं जात आहे. परंतु शिवसेना आमदार बालाजी किणीकर (Balaji Kinikar) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नंदकुमार ननावरे हे आपले खासगी पीए नव्हते, असं जाहीर केलं आहे आणि यासंबंधीच्या चुकीच्या अफवा पसरवू नये, असं आवाहन देखील किणीकरांनी केलं आहे.


दाम्पत्याच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट


मिळालेल्या माहितीनुसार, मृत नंदकुमार ननावरे हे आपल्या परिवारासह उल्हासनगर कॅम्प नंबर 4 येथील आशेळेपाडा परिसरात राहत होते. मंगळवारी दुपारच्या सुमारास त्यांनी आपली पत्नी उर्मिला हिच्यासह राहत्या बंगल्याच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. या घटनेनंतर आशेळेपाडा परिसरात शोककळा पसरली आहे. ननावरे दाम्पत्याने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप देखील समजलं नसून पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.


नंदकुमार ननावरे हे पुर्वी दिवंगत माजी आमदार ज्योती कलानी यांच्याकडे स्वीय सहाय्यक (पीए) म्हणून काम करत होते. त्यानंतर गेल्या काही वर्षांपासून ते अंबरनाथ विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्याकडे खाजगी पीए म्हणून काम करत असल्याचं बोललं जात आहे.


दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरातही घडली अशीच काहीशी घटना


अवघ्या तीन महिन्यांपूर्वी पत्नीचा हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर नैराश्यात असलेल्या पतीने गळफास घेत जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडली. संदीप भगवान बेलवळे (वय 39, रा. बेलवळे खूर्द, सध्या रा. मोहिते मळा, देवकर पाणंद, कोल्हापूर) असं त्यांचं नाव आहे. आईच्या आकस्मिक मृत्यूने आणि वडिलांनी घेतलेल्या टोकाच्या निर्णयाने त्यांचा  एकुलता एक मुलगा पोरका झाला आहे. पत्नीच्या निधनानंतर निराशेच्या गर्तेत गेलेल्या संदीप यांना मानसिक आधार देण्यासाठी त्यांच्या मातोश्री त्यांच्यासोबत कोल्हापूर शहरात राहत होत्या. त्या सातत्याने समजून सांगण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र, तरीही त्यांनी टोकाचा निर्णय घेतला. 


17 वर्षांच्या संसाराचा धक्कादायक शेवट


संदीप आणि त्यांची पत्नी अनुराधा यांचा 2006 मध्ये विवाह झाला होता. शेती तसेच व्यवसाय करुन त्यांचे कुटूंब स्थिरस्थावर झाले होते. त्यांना एकुलता एक 14 वर्षांचा मुलगा आहे. सर्व काही आनंदात सुरु असतानाच एप्रिल 2023 मध्ये संदीप यांच्या पत्नी अनुराधा यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर संदीप यांनी पत्नीच्या विरहाने नैराश्याने ग्रासले होते. 


आठवडाभरापासून बेपत्ता अन् टोकाचा निर्णय


पत्नीच्या विरहाने नैराश्यात गेलेल्या संदीप 25 जुलैपासून बेपत्ता झाले होते. यानंतर त्यांचा गिरगाव हद्दीत (ता. करवीर) गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या स्थितीत मृतदेह आढळून आला. त्यामुळे अवघ्या तीन महिन्यात कुटुंबाला दुसरा मानसिक धक्का बसला आहे. संदीप यांच्या पश्चात मुलगा, आई, भाऊ असा परिवार आहे. भाजप कागल तालुका सरचिटणीस  सागर कांबळे यांचे ते बंधू होते.


हेही वाचा:


ती रडत होती, ओरडत होती...पण तो मारतच होता; दुसऱ्या मुलासोबत दिसल्याने तरुणीला बेदम मारहाण