Jasprit Bumrah :  जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात भारतीय संघाने आयर्लंडविरोधात पहिल्या टी 20 सामन्यात दोन धावांनी विजय मिळवला. पावसाने सामन्यात खोडा घातल्यामुळे डकवर्थ लुईस नियमांनुसार, भारताला दोन धावांनी विजयी घोषीत करण्यात आले. या सामन्यात भेदक मारा करणाऱ्या जसप्रीत बुमराह याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. कर्णधारपद सांभाळल्यानंतर पहिल्याच सामन्यात सामनावीर पुरस्कार मिळवणारा जसप्रीत बुमराह पहिलाच भारतीय कर्णधार होय. याआधी विरेंद्र सेहवाग, धोनी, विराट आणि रोहित शर्मा यांनाही हा कारनामा करता आला नव्हता. नेतृत्व सांभाळत पहिल्याच सामन्यात सामनावीर पुरस्कार पटकावण्याचा पराक्रम जसप्रीत बुमराहने केला आहे. 


जसप्रीत बुमराह भारताचा अकरावा टी 20 कर्णधार म्हणून शुक्रवारी मैदानात उतरला होता. या सामन्यात बुमराहने भेदक मारा करत आयर्लंडच्या आघाडीच्या फलंदाजांना तंबूत धाडले होते. पहिल्याच षटकात बुमराहने दोन विकेट घेत भारताचे पारडे जड केले होते. बुमराहला या प्रभावी कामगिरीमुळे सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. 



पहिल्याच सामन्यात बुमराहचा प्रभावी मारा - 


बुमराहने जवळपास वर्षभरानंतर भारतीय संघात कमबॅक केलेय. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा होत्या. त्याने पहिल्याच षटकात दोन फलंदाजांना तंबूत पाठत दणक्यात कमबॅक केले. आशिया चषक आणि विश्वचषकाआधी जसप्रीत बुमराह तंदुरुस्त होणं, भारतासाठी महत्वाचे होते. फिट झालेल्या बुमराहला आयर्लंड दौऱ्यात कर्णधार म्हणून पाठवण्यात आले. बुमराहने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाल. बुमराहने पहिल्याच षटकात भेदक मारा करत सर्वांचं लक्ष वेधले. बमराहने पहिल्या षटकात फक्त 4 धावा देत दोन विकेट घेतल्या. बुमराहने एंड्रयू बालबर्नी आणि लोरकन टकर यांना तंबूचा रस्ता दाखवला. बालबर्नी  याने बुमराहच्या पहिल्यांच चेंडूवर चौकार मारत आपले इरादे स्पष्ट केले. पण बुमराह याने पुढच्याच चेंडूवर बालबर्नी याला त्रिफाळाचीत बाद करत हिशोब चुकता केला. बुमराहने टाकलेला अप्रतिम चेंडू बालबर्नी  याला समजलाच नाही. बुमराहचा चेंडू बालबर्नी  याच्या बॅटची कड घेऊन गेला. त्यानंतर तिसरा आणि चौथा चेंडू बुमराहने निर्धाव टाकला. पाचव्या चेंडूवर लोरकन टकर संजूकरवी झेलबाद केले. 


डकवर्थ लुईस नियमांनुसार भारताचा दोन धावांनी विजय - 


भारत आणि आयर्लंड यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्याचा निकाल डकवर्थ लुईस नियंमानुसार लागला. भारतीय संघाने दोन धावांनी सामन्यात बाजी मारली. आयर्लंडने प्रथम फलंदाजी करताना सात विकेटच्या मोबदल्यात 139 धावांपर्यंत मजल मारली होती. आयर्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय सलामी फलंदाजांनी आक्रमक सुरुवात केली. पावसामुळे सामना थांबण्यापूर्वी भारताने 6.5 षटकात दोन विकेटच्या मोबदल्यात 47 धावा केल्या. पावसामुळे सामना थांबला तेव्हा भारतीय संघ डकवर्थ लुईस नियमांनुसार दोन धावांनी आघाडीवर होता. त्यामुळे भारतीय संघाला दोन धावांनी विजयी घोषीत केले.  यशस्वी जायस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांनी 46 धावांची सलामी दिली. यशस्वी जायस्वाल याने 24 धावांचे योगदान दिले. यशस्वीने 23 चेंडूत एक षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने 24 धावांची खेळी केली. तिलक वर्माला खातेही उघडता आले नाही. ऋतुराज गायकवाड 16 चेंडूत एक चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 19 धावांवर नाबाद राहिला. संजू सॅमसन एका धावेंवर नाबाद होता. आयर्लंडकडून क्रेग यंग याने दोन विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराहला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.