Nagpur News नागपूर : जुगार खेळण्याच्या नादात कर्जाचे डोंगर झाले आणि हे कर्ज फेडण्यासाठी चक्क तिघांनी घरफोडी करण्याचे धाडस केले. मात्र हे कर्ज फेडण्यापूर्वीच पोलिसांनी (Nagpur Police) त्यांचा प्रयत्न हाणून पाडला आहे. ही यशस्वी कारवाई नागपुरातील (Nagpur News) पारडी पोलिसांनी केली. घटनेमध्ये तीन संशयित आरोपींनी 18 लाखांचा मुद्देमाल चोरी (Nagpur Crime News) केला आणि त्यानंतर त्यांच्या तीन मित्रांच्या सहकार्यने तो आपसात वाटूनही घेतला. मात्र या चोरीच्या घटनेनंतर पोलिसांनी तपासाचे चक्र गतिमान करत यातील सहाही आरोपींचा शोध घेत त्यांना बेड्या ठोकल्या आहे.
घरातील 18 लाख केले लंपास
पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे शिवकुमार चैतराम निनावे (52, रा. भवानीनगर) हे आपल्या घराला कुलूप लाऊन भावाच्या लग्नासाठी कांजी हाऊस येथे गेले होते. 31 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान घरी कुणीही नव्हते. या संधीचा फायदा घेत काही आज्ञातांनी त्यांच्या घराच्या वॉल कंपाउंड आणि मुख्य दारांचे कुलूप तोडले. त्यानंतर घरात प्रवेश करत त्यांनी घरची झडती घेतली असता त्यांना एक आलमारी दिसून आली. त्यानंतर या चोरट्यांनी आलमारीचे कुलूप तोडून आणि लॉकर वाकवून त्यातील 18 लाख रुपये चोरी केले. शिवकुमार यांचा आरामशीनचा व्यवसाय आहे. त्यासाठी त्यांनी घरी 18 लाख रुपये आणून ठेवले होते. नेमके त्याच पैशांवर या अज्ञातांनी डल्ला मारला.
विधीसंघर्षित बालकासह सहाजणांना अटक
शिवकुमार 1 फेब्रुवारीला घरी परतल्यानंतर त्यांना संपूर्ण प्रकार लक्षात आला. त्यांनी तत्काळ पोलीस स्टेशन गाठत या बाबत तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यादिशेने तपास सुरू केला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील सहा संशयितांना अटक केली आहे. शंकरलाल ऊर्फ शंकरू मदन टंडन (वय 28), रितीक ऊर्फ समोसा कन्हैया झा (19, दोघे. रा. शिवशक्ती नगर, पारडी), हर्ष ऊर्फ हऱ्या युवराज इंगोले (22, रा. शिवनगर, पारडी), तुषार ऊर्फ एमडी रामेश्वर बिसेन (22, रा. शामनगर, पारडी), कुणाल ऊर्फ रवी ऊर्फ बारीक राममुरत गुप्ता (19, रा. दुर्गा नगर, पारडी) आणि एक अल्पवयीन बालक अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
शंकरलाल, रितीक आणि विधीसंघर्षित बालकाने ही रक्कम चोरी केली. त्यानंतर त्यांनी ही बाब आपले संशयित आरोपी मित्र हर्ष ऊर्फ हऱ्या, तुषार ऊर्फ एमडी आणि कुणालला सांगितली. त्यांनी काही झाल्यास आम्ही सांभाळून घेतो, असे सांगितल्यानंतर सहाही संशयित आरोपींनी चोरीची रक्कम आपसात वाटून घेतली होती. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपास करीत या सहाही आरोपींना अटक केली. तपासात त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून दुचाकीसह सहा लाख 96 हजार 90 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.