Nagpur News नागपूर:   पुण्यापाठोपाठ आता नागपूरमध्येही गुन्हेगारांची ओळख परेड काढण्यात आली. नवे पोलीस आयुक्त  डॉ. रवींद्रकुमार सिंगल (Dr. Ravinder Kumar Singal) यांनी कुख्यात गुंडांना आयुक्तालयात बोलावून तंबी दिली.  डॉ. रवींद्रकुमार सिंगल (Dr. Ravinder Kumar Singal) यांनी पदभार स्वीकारल्यानंतर, पहिल्याच आठवड्यात उपराजधानीत झालेल्या हत्येच्या मालिकेने शहर हादरले होते. शहरात वाढणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना आणि पुन्हा गुन्हेगार सक्रीय होत असल्याने, त्यांच्या कारवायांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिस आयुक्तांनी  (Nagpur Police) रेकॉर्डवरील 137 गुन्हेगारांना सज्जड दम दिला.  नागपूर शहरात इथून पुढे कुठल्याही गुन्ह्यात नाव आढळून आल्यास परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवण्याचा इशारा त्यांना दिला. शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मकोका, खून, हल्ला करणे, लुटपाट, एनडीपीएस यांच्यासह इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये सक्रीय असलेल्या गुन्हेगारांना आयुक्तालयात बुधवारी ओळख परेडसाठी बोलाविण्यात आले होते. त्यावेळी पोलीस आयुक्त सिंगल यांनी आपल्या खास पद्धतीने या गुन्हेगारांना तंबी देत कायद्याचा 'डोस' दिला. 


 137 गुन्हेगारांना कायद्याचा 'डोस'


पोलिस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून नागपूर शरात सलग हत्येचा घटना घडल्या होत्या. परिणामी पोलीस आयुक्त डॉ. सिंगल यांनी शहरातील कायदा, सुव्यवस्था आणि गुन्हेगारीचा आढावा घेतला. त्यानंतर सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रातील सक्रिय आणि नावाजलेल्या गुन्हेगारांची सविस्तर माहिती सादर करण्यासाठी सांगण्यात आले. ज्यामध्ये शहरातील विविध गुन्ह्यांमधील टॉप 137 गुन्हेगारांना बुधवारी सिंगल यांनी पोलीस आयुक्तालयात बोलवत  कायद्याचा 'डोस' दिला. सुमारे साडेतीन तास चाललेल्या या परेडमुळे गुन्हेगारांमध्ये देखील एकच खळबळ उडाली होती. दुपारी पोलीस आयुक्तांनी प्रत्येकाशी व्यक्तीशा बोलून त्यांना यापुढे एकही गुन्हा घडल्यास त्यांची खैर नसल्याचा इशारा दिला. विशेष म्हणजे, रवींद्र सिंगल यांनी गुन्हेगारांची सविस्तर माहिती घेतली. सोबत चित्रफीत देखील घेण्यात आली. गुन्हेगारांना त्यांची सद्य परिस्थीती, त्यांचा काम धंदा, या बाबत सविस्तर विचारपूस केली. शहरात एखादी घटना घडल्यास त्या घटनेत कोणाचा समावेश आहे, याची माहिती काढणे आता पोलिसांना सोपे जाणार आहे.


'टॉप 20' गुन्हेगारांचा समावेश


पोलिस मुख्यालयात बोलाविण्यात आलेल्या गुन्हेगारांमध्ये कुख्यात अश्विन रामासे (जरीपटका), रवींद्र उईके (जरीपटका), राहुल खोब्रागडे (जरीपटका), अंकीत फुके (बर्डी), अब्दुल करीम शेख (मानकापूर), राकेश हेडाऊ (तहसिल), सीतारा शाहु (शांतीनगर), सनी समुद्रे (लकडगंज), सनी चव्हाण (ईमामवाडा), मयुर फुले (ईमामवाडा), रोहीत नंदनवार (पारडी), सौरभ कडु (प्रतापनगर), जाकीर खान, दानिश खान, हर्षल पिंडा, मुकेश काटोले, मुकेश कैची इत्यादींसह इतरकाही कुख्यात गुंडांनाही बुधवारी आयुक्तालयात हजेरी लावली. तर यावेळी डॉ. सिंगल यांच्यासह पोलिस सहआयुक्त अस्वती दोरजे, अप्पर पोलिस आयुक्त संजय पाटील, उपायुक्त निमित गोयल यांनी प्रत्येक गुन्हेगारांची माहिती देत यापुढे गुन्हे केल्यास कठोर कारवाईला तयार राहा, असा सज्जड दम दिला. 






 


इतर महत्वाच्या बातम्या