Nitin Gadkari : भारतातील (India) अनेक भागात रस्त्यांची दुरावस्था आहे. विशेषत: ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची स्थिती वाईट झाली आहे. दरम्यान, रस्त्यांच्या स्थितीबाबत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. लवकरच भारताचे रस्ते अमेरिकेसारखे होतील, तो दिवस दूर नसल्याचे गडकरी म्हणाले. देशाला विकसित देश बनवण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात रस्त्यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचं त्यांनी सांगितलं. 


रस्ते अमेरिकेसारखे कधी होणार?


लवकरच भारताचे रस्ते अमेरिकेसारखे होतील. देशातील रस्ते आणि महामार्ग सुधारण्यासाठी भारत सरकार दिवसेंदिवस काम करत आहे. भारताचे रस्ते अमेरिकेसारखे होतील, तो दिवस दूर नाही. या वर्षाच्या अखेरीस भारताचे रस्त्यांचे जाळे अमेरिकेसारखेच चमकदार होईल. केंद्र सरकार देशभरात 36 एक्सप्रेस हायवे बांधत आहे. ज्यामुळं वेगवेगळ्या शहरांमधील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल असे गडकरी म्हणाले.  दिल्ली ते चेन्नईला जोडणाऱ्या महामार्ग प्रकल्पाच्या निर्मितीमुळे दोन्ही शहरांमधील अंतर 320 किमीने कमी होईल. आसाममधील नुमालीगडमध्ये बांबूपासून इथेनॉल तयार केले जात आहे. इंधनातील बदलामुळे आणि चांगल्या रस्त्यांच्या विकासामुळे, देशातील लॉजिस्टिक खर्च एक अंकी कमी होईल असे गडकरी म्हणाले.  


 विकास हवा असेल तर चांगल्या पायाभूत सुविधांची गरज


भांडवली गुंतवणूक आणि उद्योगाचा विकास हवा असेल तर चांगल्या पायाभूत सुविधा हव्यात. पाणी, वीज, वाहतूक आणि दळणवळण याशिवाय आपण शेती, सेवा आणि उद्योगाचा विकास करु शकत नाही. पायाभूत सुविधांशिवाय पर्यटनाचा विकास होऊ शकत नसल्याचे मत गडकरी यांनी व्यक्त केलं. 2014 मध्ये मोदीजी पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी देशातील पायाभूत सुविधांच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले. जेव्हा आपण एक महान देश विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हा आपल्याला जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा देखील विकसित कराव्या लागतील असे गडकरी म्हणाले. 


रस्ते ही एक प्रकारची समाजाला लागणारी पायाभूत सुविधा आहे. आर्थिक विकास नसल्याने अविकसित देश सामान्य जनतेला पायाभूत सुविधा, जसे, रस्ते, वीज, पिण्याचे पाणी, सांडपाण्याच्या सुविधा आदी पुरवू शकत नाहीत. पण रस्ते हे विकासाचे मार्ग आहेत. देशाच्या दळवळणाच्या सुविधा जर उत्तम पद्धतीच्या असतील तर देशाच्या विकासात त्याची भर पडते. त्यामुळं चांगले रस्ते हा विकासाच्या दृष्टीनं महत्वाचा मुद्दा आहे. 


महत्वाच्या बातम्या:


BMC : ...तर मग मुंबईतील रस्ते बंद ठेवणार का? मुंबई महापालिकेच्या कारणांवर हायकोर्टाची नाराजी