Nagpur Ceime News अल्पवयीन मुलांना हुक्का (Hookah) पुरविणाऱ्या एका पार्लरवर नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. यात संचालकासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. धरमपेठेतील क्युबा या हुक्का पार्लरवर नागपूर क्राइम ब्रँचच्या (Ceime News) एसएसबीने रविवारी ही कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी संचालक प्रफुल्ल अशोक चौधरी (38), त्याचा सहकारी प्रणय चंद्रशेखर महाजन (24 रा. तेलंगखेडी), सूरज संजय निखाडे (21), तौहीद बशीर शेख (22) आणि अझहर हुसेन खान (21) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. 


अल्पवयीन मुलांना हुक्का पुरविणाऱ्या पार्लरवर धाड 


धरमपेठे सारख्या पॉश परिसरात असलेल्या गोतमारे, कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या मजल्यावर प्रफुल्ल चौधरी याचे क्युबा नावाचे हुक्का पार्लर आहे. चौधरी हे गेल्या दोन वर्षांपासून हे पार्लर चालवत आहेत. यापूर्वीही पोलिसांनी अशाच प्रकरणात तेथे कारवाई केली होती. त्यानंतर पुन्हा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून या पार्लरमध्ये छुप्या पद्धतीने काही अल्पवयीन युवकांना प्रवेश दिला जातो. या कॉम्प्लेक्समध्ये प्रवेश करण्यासाठी एकच मार्ग असून यावरही लोखंडी रॉडचे गेट आहे.


तसेच संभाव्य पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी पार्लरच्या संचालकांनी मोठी शक्कल लढवली आहे. गोतमारे संकुलातील कार्यालये सायंकाळी बंद झाल्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराला बाहेरून कुलूप लावत केवळ विश्वासातील लोकांनाच आता प्रवेश दिला जात असल्याची देखील माहिती पुढे आलीय. सोबतच पोलिसांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवले आहेत.


संचालकासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल


असे असताना, पोलिसांनी रविवारी अचानक या पार्लरवर धाड टाकत कारवाई केली असता या ठिकाणी पोलिसांना दोन अल्पवयीन मुले आणि इतर ग्राहक हुक्का ओढताना आढळले. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर या प्रकरणी संचालकासह पाच जणांना ताब्यात घेत पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या