IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामाला सुरुवात होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्याआधी प्रत्येक संघांनं जोरदर तयारी सुरु केली आहे. आरसीबी आणि चेन्नई (RCB vs CSK) यांच्यामध्ये सलामीच सामना होणार आहे. आयपीएलच्या 16 वर्षात आतापर्यंत अनेक दिग्गजांनी यात सहभाग घेतलाय. 2008 मध्ये आयपीएलच्या रनसंग्रामाला सुरुवात झाली, पहिल्या हंगामात खेळणारे खेळाडू आताही खेळत आहेत, पण ते बोटावर मोजण्याइतकेच आहेत. यामध्ये एमएस धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, दिनेश कार्तिक यांच्या नावाचा समावेश आहे. आयपीएलमध्ये अनेक युवा खेळाडूंनीही आतापर्यंत आपली चमक दाखवली आहे. एका रात्रीमध्ये त्यांना प्रसिद्धीही मिळाली. रिंकू सिंह यानं गेल्या हंगामात एकाच षटकात पाच षटकार मारत प्रसिद्धी मिळवली होती. युवा आणि अनुभवी खेळाडूंच्या या लीगमध्ये अनेक विक्रम झाले आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वात वयस्कर आणि तरुण खेळाडू कोणता ? याबाबत कधी विचार केलाय का ? पाहूयात यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वात वयस्कर आणि युवा खेळाडू कोणता आहे... ते कोणत्या संघाकडून खेळणार....  


आयपीएल 2024 मधील सर्वात वयस्कर खेळाडू कोणता ?


2008 मध्ये आयपीएलच्या रनसंग्रमाला सुरुवात झाली. तेव्हापासून  खेळणारे काही खेळाडू आजही आयपीएलमध्ये खेळत आहेत. आयपीएलच्या 17 व्या हंगामातही ते संघाचा सदस्य असतील. यंदाच्या आयपीएलमधील सर्वात वयस्कर खेळाडू हा धोनी आहे. कॅप्टन कूल धोनी सध्या 42 वर्षांचा आहे. धोनी पहिल्या सत्रापासून आयपीएलचा भाग आहे. या 17 वर्षांच्या प्रवासात त्याने आपल्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जला आयपीएलचं पाच वेळा जेतेपद मिळवून दिलं. धोनीच्या वैयक्तिक कामगिरीवर नजर टाकली तर आजपर्यंत त्याने आयपीएलमध्ये 250 सामने खेळले आहेत. सर्वाधिक आयपीएल सामने खेळणाऱ्यांमध्ये धोनी अव्वल स्थानावर आहे. धोनीने आयपीएलमध्ये 38.79 च्या सरासरीने 5,082 धावा केल्या आहेत. 'कॅप्टन कूल'ने यादरम्यान 24 अर्धशतके ठोकली आहे.  धोनी आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी यष्टीरक्षक देखील आहे. आतापर्यंत त्याने 180 वेळा विकेटमागे फलंदाजांना बाद केलेय. 


आयपीएलचा सर्वात तरुण खेळाडू कोण ?


18 वर्षीय अंगक्रिश रघुवंशी हा यंदाच्या आयपीएलमधील सर्वात तरुण खेळाडू असेल. रघुवंशीचा जन्म 5 जून 2005 रोजी दिल्ली येथे झाला. त्याला कोलकात्यनं आयपीएल लिलावात घेतले आहे. कोलकात्यानं त्याच्यावर 20 लाखांची बोली लावली. 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या अंडर-19 क्रिकेट विश्वचषकादरम्यान आंगक्रिश प्रसिद्धीच्या झोतात आला होता. 2022 च्या विश्वचषकात त्याने भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्यावेळी त्याने 6 सामन्यात 46.33 च्या सरासरीने 278 धावा केल्या, ज्यात एक शतक आणि एक अर्धशतकाचा समावेश होता.