Mount Mary Fair 2022 : वांद्रे येथील माउंट मेरी जत्रेत चोरी करण्यासाठी मुंबईत आलेल्या राजस्थानमधील जोडप्याला वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे. वांद्रे येथे जत्रेत (Mount Mary Fair) एका तीन वर्षीय मुलीची सोनसाखळी चोरल्याप्रकरणी पोलिसांनी दाम्पत्याला अटक केली आहे. वांद्रे पोलिसांनी सीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या मदतीने गुन्ह्याच्या काही तासांतच आरोपी जोडप्याचा शोध घेतला.  मात्र त्या व्यक्तीने ते गिळल्यामुळे सोने परत मिळण्यास वेळ लागला.  पोलिसांनी (Police) त्याला सायन रुग्णालयात नेले जेथे डॉक्टरांनी एंडोस्कोपीनंतर सोन्याची चैन काढण्यात आली.


पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी हे नालासोपारा रहिवासी सेल्वी नारकर, त्यांची मुलगी अनन्या (तीन वर्ष), आणि सेल्वीची बहीण शनिवारी दुपारी वांद्रे जत्रेत Mount Mary Fair) आले होते.  जत्रेत फिरण्यापूर्वी कुटुंबाने चर्चला प्रार्थना केली. त्यानंतर ते चर्चचा बाहेर असलेल्या क्रॉसला हात लावायला आले. तेव्हा आरोपीने गर्दीचा फायदा घेत चैन काढून घेतली. अनन्या रडू लागल्याने सेल्व्हीने तिला विचारलं असता ती बोलली की चैन कोणी घेतली आणि गळ्याला हात लावून दाखवू लागली. म्हणून आईने जवळ असलेल्या पोलिसांसोबत संवाद साधला. घडलेल्या सर्व प्रसंगाबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ कारवाई केली.


पोलिसांनी कार्यक्रमस्थळी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आणि तानियाच्या मागे लागलेले एक जोडपे त्यांना दिसले. यात ती महिला प्रार्थना करत असताना सोनसाखळी हिसकावत असल्याचे दिसून आले.  त्यानंतर महिला आणि पुरुष विरुद्ध दिशेने पळून गेल्याचं फुटेजमध्ये दिसलं. वांद्रे पोलिसांच्या पथकाने संध्याकाळी राकेश माळी आणि सीता माळी या जोडप्याचा शोध घेतला.  पोलिसांच्या पथकाला त्यांच्याकडून सोनसाखळी सापडली नाही.  चौकशी केली असता पती राकेश माळी याने अटक टाळण्यासाठी सोनसाखळी गिळल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी राकेशला सायन रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी एन्डोस्कोपी करून रविवारी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास सोनसाखळी काढून घेतली.  त्याच्या पचनसंस्थेत सोने अडकल्याचे डॉक्टरांनी सांगितले.


पोलिसांना दिलेल्या माहिती प्रमाणे, राकेश आणि सीता हे राजस्थानमधील दूधवाला गावातील आहेत.  माउंट मेरी फेअरला भेट देणाऱ्या लोकांकडून सोने चोरण्यासाठी ते नुकतेच त्यांच्या आठ महिन्यांच्या मुलासह मुंबईत आले होते.  ते विरार रेल्वे स्थानकाजवळील फूटपाथवर राहत होते, अशी माहिती पोलिसांना त्यांनी दिली. या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.