Cyber Fraud Crime:   अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर ट्रस्टच्या नावाने भाविकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोन सायबर चोरांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर ट्रस्टच्या गूगल वेब प्रोफाइलवरील मोबाईल नंबर एडिट करून भक्ती निवासाचे बुकिंग करत असल्याचे सांगून आरोपींकडून भाविकांची आर्थिक फसवणूक होत होती. 


माटुंगा पोलीस ठाणे सायबर क्राईम विभागाने या प्रकरणी आरोपी शाहरुख शरीफ खान (22 वर्ष) आणि सौरभ विशालसिंग गुर्जर (19 वर्ष) या दोघांना मध्य प्रदेश राज्यातून अटक करण्यात आली आहे. 


माटुंगा परिसरात राहणाऱ्या तक्रारदारांनी आपल्या परिवारासोबत डिसेंबर 2022 रोजी अक्कलकोट येथे स्वामी समर्थ यांच्या दर्शनासाठी जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी, अक्कलकोट येथे राहण्यासाठी भक्तीनिवास बुक करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी गुगलची मदत घेतली.  त्यावेळी मंदिर ट्रस्टच्या वेबपेजवर दिसणाऱ्या फोन क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला. त्यावेळी त्यांना बुकिंगसाठी 2200 रुपये आगाऊ नोंदणीसाठी भरण्यास सांगितले. ही रक्कम जी पे द्वारे (G-pay) भरण्यास सांगितले. 


तक्रारदारांनी त्या क्रमांकावर G-Pay द्वारे 2200 रुपये बुकिंग अमाउंट म्हणून भरली. मात्र, पुढील मेसेजने त्यांना धक्का बसला. तक्रारदाराच्या खात्यातून तीन लाख 9 हजार 855 रुपये डेबिट झाल्याचा मेसेज त्यांना आला. 


ही आर्थिक फसवणूक झाल्याचे समजताच पीडित व्यक्तीने माटुंगा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तक्रार दाखल करून भारतीय दंड विधान कलम 419,420,467,468,471,120(b) सह कलम 66 (क), (ड ) माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 प्रमाणे गुन्हा दाखल केला. 


तांत्रिक मदतीचा आधारे पोलीसांनी या दोन आरोपीला अटक केली.  त्यांना न्यायालय हजर केले असता त्यांना 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. 
 
अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज ट्रस्ट यांचेकडे आतापर्यंत 14 व्यक्तींची फसवणूक झाल्याची माहिती मिळाली आहे. सदरचे सर्व तक्रारी अर्ज हे सायबर पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे दाखल आहेत. सदर बाबत अक्कलकोट ट्रस्ट व सोलापूर ग्रामीण सायबर पोलीस ठाणे येथे संपर्क करून अटक आरोपीत यांनी किती गुन्हे केले आहेत याबाबत अधिक माहिती घेत आहोत. 


तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या असतील तरी दुसऱ्या बाजूला सायबर गुन्हेगारीदेखील वाढीस लागली आहे. सायबर गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: