Bogus Doctor In Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar ) सिल्लोड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, बोगस बीएएमएस पदवीधारक तरुण 2019 पासून जिल्हा परिषदेत कंत्राटी म्हणून वैद्यकीय अधिकारी पदावर नोकरी करीत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने आरोग्य विभागात खळबळ उडाली असून, या प्रकरणी बोगस डॉक्टराच्या विरोधात सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहसीन खान शेरखान पठाण (रा. सिल्लोड) असे बोगस डॉक्टरचे (Bogus Doctor) नाव आहे. तर मोहसीन खान शेरखान पठाण हा 2019 पासून कंत्राटी पद्धतीवर सुरवातीला आमठाणा (ता. सिल्लोड) येथे कार्यरत होता. त्यानंतर त्याने 6 एप्रिल 2022 रोजी 11 महिन्यांच्या कंत्राटी पद्धतीवर वैद्यकीय अधिकारी पदासाठी मुलाखत दिली आणि त्याची निवडही झाली. नंतर अंधारी (ता. सिल्लोड) येथे नियुक्त झाला होता.


प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी वैद्यकीय अधिकारी नेमण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर 24 मार्च 2022 रोजी जाहिरात प्रसिद्ध करून 6  एप्रिल 2022  रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक दयानंद मोतीपवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांच्या समितीने उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने त्यातील काही उमेदवारांना 11 महिन्यांची कंत्राटी पदस्थापना दिली होती. त्यात आरोपी मोहसीन खान याचाहाही सहभाग होता. तसेच त्याला अंधारी (ता. सिल्लोड) येथे नेमणूक मिळाली होती.


अन् अखेर भांडाफोड झाला... 


सिल्लोड पंचायत समितीच्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी डिसेंबर 20212 मध्ये जिल्हा परिषदेकडे मोहसीन खानच्या बोगस पदवीचा प्रताप मांडला होता. मात्र त्यावेळी कोणतेही कारवाई झाली नव्हती. पुढे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांनी पठाणच्या पदवी प्रमाणपत्राबाबत 17 जानेवारी रोजी भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग, नवी दिल्ली व महाराष्ट्र कॉन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन यांच्याकडे पत्रव्यवहार, ईमेलद्वारे संपर्क केला असता, मोहसीन खान पठाण या नावाच्या कोणत्याही व्यक्तीने 2022 ते 2011 या कालावधीत साई आयुर्वेदिक महाविद्यालय, अलिगड येथून बीएएमएस पदवी प्राप्त केली नसल्याचे 16  फेब्रुवारी रोजी कळविले. तसेच, महाराष्ट्र कॉन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनचे प्रबंधक डॉ. डी. यू. डांगे यांनीही 19 जानेवारी रोजी नोंदवहीत मोहसीन हे नोंदणीकृत नसल्याचे पत्राद्वारे जिल्हा परिषदेला कळविले. त्यानंतर मोहसीन खान यांचा भंडाफोड झाला.


पालकमंत्री भुमरेंची प्रतिक्रिया! 


दरम्यान या सर्व प्रकारावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांची देखील प्रतिक्रिया आली आहे. 'जो काही प्रकार घडला आहे, तो गंभीर आहे. जेव्हा हा सर्व प्रकार समोर आला तेव्हा, प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच यापुढे देखील चौकशी करून कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मला जेव्हा याबाबत माहिती मिळाली, तेव्हा मी तत्काळ गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या असल्याचं भुमरे म्हणाले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Chhatrapati Sambhaji Nagar: जिवंत असताना त्याला मृत दाखवत रोखलं वेतन, महापालिकेचा हलगर्जीपणा; संभाजीनगरमधील घटना