Nashik NMC : नाशिक महापालिकेची (Nashik NMC) विक्रमी कर वसुली, राष्ट्रीय शहरी उपजिविका अभियानाची (एनयूएलएम) अव्वल कामगिरी आणि कमी केलेला प्रशासकीय खर्च याबाबत नाशिक महानगरपालिकेने सरस कामगिरीबद्दल नगरविकास दिनानिमित्त नाशिक महापालिकेला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले. यानिमित्ताने महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


मुंबईत (Mumbai) नगरविकास दिनानिमित्त राज्यातील महापालिकांनी विविध कामांमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आयुक्तांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी 2022-23 मध्ये नागरी प्रशासनाच्या विविध कामांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल नाशिक (Nashik) महानगरपालिकेला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले आहे. नाशिक महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांचा सत्कार करण्यात आला. सन ‘अ’, ‘ब’, ‘क’ वर्ग महानगरपालिका या गटातून नाशिक महानगरपालिकेस प्रथम क्रमांकाने नगर विकास दिनाच्या निमित्ताने गौरविण्यात आले आहे. विशेषता विक्रमी कर संकलन, राष्ट्रीय शहरी उपजिविका अभियानाची (एनयूएलएम) अव्वल कामगिरी आणि कमी केलेला प्रशासकीय खर्च यामुळे मनपाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. 


यावेळी नाशिक महानगर पालिकेच्या आयुक्त आणि कर विभागाच्या उपायुक्त अर्चना तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कर विभागातील कर्मचारी आणि सहा विभागीय अधिकारी यांचे अथक प्रयत्न तसेच प्रभावी वसुली मोहीम राबवल्याने 2022-23 चे कर वसुलीचे उद्दीष्ट पूर्ण झाले आहे. 150 कोटी कर वसुलीचे उद्दीष्ट होते. नाशिक मनपाच्या इतिहासात प्रथमच 125 टक्के वसुली होऊन 188 कोटी 73 लाख रुपये इतका मालमत्ता कर मनपाच्या तिजोरीत जमा झाला आहे.  तसेच उपायुक्त करुणा डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक मनपाने दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय शहरी उपजिविका अभियान (एनयूएलएम) अंतर्गंत सर्व घटकांमध्ये 100 टक्के उद्दीष्ट पूर्ण केले आहे. 


जास्त वसुली, कमी खर्च.... 


दरम्यान बचत गट बनविणे, त्यांना शासनाकडून फिरता निधी देणे तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कौशल्य प्रशिक्षण देणे, स्वयंरोजगाराकरीत बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करुन देणे, बेघर व्यक्तींना बेघर निवारा केंद्रा अंतर्गंत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणे या सर्व घटकांमध्ये मनपाने उत्कृष्ट काम केले आहे. तसेच प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) योजने अंतर्गंत महाराष्ट्रात 140 टक्के काम करुन मनपाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.  तसेच नाशिक मनपाने 2022-23 मधील आस्थापना खर्च आटोपशीर ठेवण्यात यश मिळविले आहे. प्रशासन उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांनी मनुष्यबळाचे योग्य नियोजन करुन आणि प्रभावी उपाययोजना राबवुन 33.03 टक्के एवढा प्रशासकीय खर्च मर्यादीत ठेवण्यात यश मिळवले आहे.