(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'त्या' तरुणीवर लैंगिक अत्याचार नाही? शवविच्छेदन अहवाल पोलिसांच्या हाती, DNA अहवालाची प्रतीक्षा
Marine Drive Hostel Crime Case: मरीन ड्राईव्ह हत्या प्रकरणात नवी बाब समोर आली आहे, तरुणीवर लैंगिक अत्याचार झाला नव्हता, असं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
Marine Drive Crime Case : मरीन ड्राईव्हमधील (Marine Drive) वसतिगृहातील तरुणी हत्या प्रकरणात एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. शवविच्छेदन अहवालात मृत मुलीच्या संवेदनशील भागांवर आणि शरीरावर कोणताही विशिष्ट लैंगिक अत्याचार झाल्याचं आढळलं नसल्याचं समोर आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र, मुलीवर लैंगिक अत्याचार झाला आहे की नाही, हे तपासण्यासाठी पोलीस डीएनए चाचणीसह अन्य चाचण्यादेखील करणार आहेत. मृतदेह आढळल्यावरची परिस्थिती पाहता पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा देखील दाखल केला होता. दरम्यान, आता अन्य चाचण्यांचे अहवाल समोर आल्यावरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.
मरीन ड्राईव्हच्या वसतिगृहातील पीडित तरुणीचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला आहे. या अहवालात लैंगिक अत्याचाराशी संबंधित कोणतंही तथ्य आढळलेलं नाही. अशातच अद्याप पूर्ण अहवाल पोलिसांना प्राप्त झाला नसल्याचीही माहिती मिळत आहे. अशातच आता याप्रकरणी पोलीस डीएनए चाचणीसह इतरही अनेक चाचण्या करणार आहेत. तसेच, याप्रकरणी पोलिसांचा सखोल तपासही सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी गुन्ह्याची गंभीरता आणि परिस्थिती पाहून प्राथमिक तपासात समोर आलेल्या तथ्यांच्या आधारे हत्या आणि भारतीय दंड संहितेच्या 376 अन्वये बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
पाहा व्हिडीओ : Mumbai Crime: मरीन ड्राइव्हच्या घटनेतील त्या मुलीच्या पोस्टमार्टममधून नवी माहिती समोर : सूत्र
काय आहे प्रकरण?
मुंबईतील मरीन ड्राईव्हजवळील असलेल्या सावित्रीबाई फुले वसतिगृहात (Savitridevi Phule Girls Hostel) 18 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला. पोलिसांना फोन आला त्यावर सावित्रीबाई फुले हॉस्टेलमध्ये एक मुलगी मृत सापडली आहे आणि दरवाजा बाहेरून लॉक आहे, अशी माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. छात्रालयाच्या सुरक्षारक्षकानंच तिच्यावर अतिप्रसंग करुन त्यानंतर तिची हत्या केल्याचं बोललं जात आहे. तसेच, त्यानंतर छात्रालयाच्या सुरक्षारक्षकानं स्वतःच रेल्वेखाली जाऊन आत्महत्या केली. सुरक्षा रक्षकाचा मृतदेह पोलिसांना आढळला.
यापूर्वीही सुरक्षारक्षकाचा विद्यार्थीनीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरातील वसतिगृहातील तरुणीच्या हत्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हत्येतील आरोपी सुरक्षारक्षकानं काही दिवसांपूर्वी असाच प्रयत्न केल्याचं समोर आलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी काही दिवसांपूर्वी पहाटे 5 वाजता मृत तरुणीच्या खोलीत जबरदस्ती घुसला होता. मृत तरुणीने तिच्या हत्येच्या तीन दिवस आधी ही माहिती तिच्या मैत्रिणीला दिल्याचं समोर आलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :