Mumbai Crime : 11 कोटी रुपयांचे 1850 आयफोन (iPhone) चोरुन कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी एका माजी कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Ingram Micro India pvt ltd ही अॅपल उत्पादनांच्या (Apple Products) अधिकृत वितरक कंपनी आहे. या कंपनीच्या माजी कर्मचाऱ्याने बोगस पावत्या सादर करुन आणि विक्री दाखवण्यासाठी बनावट नोंदी करुन मालकाची फसवणूक केली. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा (Economic Offences Wing) आता या माजी कर्मचाऱ्याचा शोध घेत आहे.


Ingram Micro India pvt ltd या कंपनीने संबंधित माजी कर्मचाऱ्याविरोधात विक्रोळीच्या पार्कसाईट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली असून पोलिसांना गुन्हा दाखल केला आहे. या कंपनीचं कार्यालय सध्या विक्रोळी पश्चिम इथे आहे. 


मनिष पुजारी (वय 35 वर्षे) असं आरोपीचं नाव असून तो कुर्ला इथे राहतो. मनिष पुजारीने डिसेंबर 2014 ते 2020 या कालावधीत सेल्स मॅनेजर म्हणून Ingram Micro India pvt ltd या कंपनीत काम केलं. या कार्यकाळात रिलायन्स रिटेल लिमिटेड या फर्मच्या ग्राहकांशी व्यवहार करण्याची संपूर्ण जबाबदारी मनिष पुजारीवर सोपवण्यात आली होती. रिलायन्स रिटेल लिमिटेडला तक्रारदार फर्म आयफोनचा पुरवठा 15 ते 21 दिवसांच्या क्रेडिटवर करते, असं आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितलं.


डिसेंबर 2020 मध्ये मनिष पुजारीने नोकरीचा राजीनामा दिला. काही दिवसांनंतर Ingram Micro India pvt ltd या फर्मला कळले की नोव्हेंबर 2020 पर्यंत रिलायन्स रिटेल लिमिटेडला विकलेल्या आयफोनची 11.13 कोटी रुपयांची थकबाकी आहे. वितरक कंपनीने क्लायंटकडे प्रलंबित थकबाकीबद्दल चौकशी केली तेव्हा त्यांनी तक्रारदार फर्मला कळवले की त्यांनी कंपनीकडे ऑक्‍टोबर 2020 पर्यंतची सर्व थकबाकी मंजूर केली. त्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.


पुजारी हा बोगस पावत्या सादर करुन विक्री दाखवण्यासाठी बनावट नोंदी करत होता. या प्रकरणी पार्कसाईट पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हा शाखा करत आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या