Nagpur Crime : नागपूर आणि गुन्हे हे जणू समीकरणच झालं आहे. जिल्ह्यात हत्या, हाणामारी, लूटमार झाली नाही असा एकही दिवस नाही. शहरातील सुप्रसिद्ध शंकरनगर चौकावरील पेट्रोल पंपावरच काल (13 जुलै) रात्री हत्येची घटना घडली. शहारोज उर्फ सोनू खान (वय 42 वर्ष) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना अटक केली आहे.


जिमवरुन परत येणारा शहारोज काल रात्री अकराच्या सुमारास आपल्या गाडीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी शंकरनगर चौकातील पेट्रोल पंपावर आला होता. हल्लेखोर आधीपासूनच त्याचा पाठलाग करत होते. पहिल्यांदा दोन आरोपी आपल्या वाहनातून तिथे पोहोचले आणि शहारोजसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. याचवेळी ऑटो रिक्षामधून चार ते पाच जण पेट्रोल पंपावर आले. सगळ्यांनी शहारोजला घेरलं आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. हल्लेखोरांनी शंकरनगर पेट्रोल पंपावर अनेकांच्या देखत त्याच्यावर हल्ला चढवला. त्यांनी शहारोजला दगडाने मारहाण केली. यावेळी तिथे असलेल्या काही परिचित लोकांनी शहारोजला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु हल्लेखोरांनी त्यांनाही मारहाण केली. याशिवाय पेट्रोल पंपवर उभ्या असलेल्या तीन ते चार वाहनांचंही नुकसान झालं. काही कर्मचाऱ्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. हत्या केल्यानंतर मारेकऱ्यांनी पेट्रोल पंपावरील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे फोडले आणि डीव्हीआर आपल्यासोबत घेऊन गेले आहेत.


या घटनेची माहिती मिळताच बजाजनगर आणि सीताबर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शहारोजला उपचारांसाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. परंतु तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाची पाहणी केली.


पूर्व वैमनस्यातून हत्या?
मृत शहारोज हा नागपूरचा कुख्यात गुंड शेखू खानचा भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. जुन्या वैमानस्यातून ही घटना घडली आहे का अशी शंका निर्माण झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे 2013 मध्ये शेखू खानने शंकरनगर चौकातच भाजपचे पदाधिकारी हेमंत दियेवार यांची गोळ्या घालून हत्या केली होती.


शहारोजचे कोणासोबतही वाद नव्हते : शहानवाज खान, भाऊ
दरम्यान हत्या झालेल्या शहारोजच्या भावाने जिमवरुन परत येत असताना शहारोजचे रस्त्यावर ऑटो चालकासोबत वाद झाले होते. त्यामधूनच ही घटना घडल्याचा दावा केला आहे. शहारोजचे कोणासोबतच वाद नव्हते. त्याने कायद्याचे शिक्षण घेतले होते. आमच्या घरात सर्वात जास्त शिकलेला तोच होता. जिमवरुन परत येताना पेट्रोल भरण्यासाठी शहारोज पंपावर थांबला होता. त्यावेळी त्याची हत्या झाली. पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. पुढील तपास करत आहेत. मारेकरी हे जवळच्याच झोपडपट्टीमधील राहणारे आहेत, अशी माहिती शहारोजचे मोठे भाऊ शहानवाज खान यांनी दिली.