Nashik News : नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस अद्यापही कायम आहे. या पावसात नाशिकमध्ये आतापर्यंत चार वाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे नाशिक मनपा (Nashik NMC) प्रशासन ऍक्शन मोडवर आले असून धोकादायक वाडे रिकामे करण्यास सुरवात केली आहे. आतापर्यत सहा वाड्यांचा परिसर रिकामा करण्यात आला आहे.


दरम्यान नाशिक शहरात मागील आठवड्यापासून पावसाने (Rain) जोरदार हजेरी लावली आहे. दरवर्षी पावसाळ्यात शहरातील धोकादायक वाड्यांच्या प्रश्न ऐरणीवर येत असतो. यंदा मात्र प्रशासनाने कडक भूमिका घेत दोन नोटीस बजावल्यानंतर थेट कारवाईचा इशारा दिला होता. त्यामुळे दुसरी नोटीस बजावल्यानंतर आता महापालिका प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आला असून सहा धोकादायक वाडे आतापर्यंत रिकामे करण्यात आली आहे. विभागीय अधिकाऱ्यांनी त्वरित वाडे रिकामे करण्याची कारवाई करावी, तसेच त्यांचा पाणी व वीज कनेक्शन खंडित करण्यात यावा, असे आदेश देण्यात आले आहे. 


दरवर्षीं पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील धोकादायक वाडयांना नोटिसा बजावण्यात येतात. शहरातील सर्व सहा विभागात महापालिका प्रशासनाच्या वतीने एकूण 1117 धोकादायक मालमत्ता यामध्ये घरे व वाड्यांना दोन नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. पावसाळा सुरू झाल्यापासून शहरातील गावठाण भाग असलेल्या जुने नाशिक परिसरातील बागवानपुरासह इतर भागात एकूण चार धोकादायक घरांचे भिंती कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून त्वरित आणखी सहा धोकादायक घरांना रिकामा करण्याची कारवाई केली. महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार, नगर रचना विभागाचे कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल तसेच विभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे. 


नाशिक महापालिकेच्या वतीने शहर परिसरातील धोकादायक इमारती तसेच अतिधोकादायक इमारतींना पावसाळ्याच्या पूर्वसंध्येलाच नोटिसा बजावण्याची कारवाई करण्यात आली होती. एकूण 1117 लोकांना प्रत्यक्ष नोटिसा देण्यात आले असून एक महिन्यानंतर दुसरी नोटीसही देण्यात आली आहे. यामुळे आता धोकादायक इमारती वाल्यांनी स्वतःहून याबाबत कारवाई करून घर रिकामे केले नाही तर वीज मीटर कापण्यापासून पाण्याचे नळकनेक्शन देखील कापण्यास सुरुवात झाली आहे. घरे रिकामे न झाल्यास जीवित हानी होणार नाही याची दक्षता घेऊन महापालिका, पोलिस प्रशासनाच्या वतीने कारवाई होणार आहे. तसेच संबंधितांची यादी वीज वितरण कंपनीला देऊन त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. 


नाशिक शहर परीसरात विशेषता जुने नाशिक तसेच पंचवटी, गंगाघाट परिसरातील जुने वाडे दर पावसाळ्यात कोसळण्याच्या घटना यापूर्वी झाल्या आहेत. अनेक घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित हानी देखील झाली आहे. तसेच कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. भाडेकरी व घर मालक यांच्यातील वादामुळे जुने नाशिक तसेच गंगा घाट परिसरातील अनेक वाडे अत्यंत जीर्ण अवस्थेत आले असले तरी त्याबाबत कारवाई होत नाही, मात्र महापालिका आयुक्तांच्या भूमिकेमुळे शहरातील हा जुना तसेच गंभीर प्रश्‍न मार्गी लागणार आहे.


नाशिक मनपा नगर नियोजन विभागाचे कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल म्हणाले कि, नाशिक मनपा हद्दीतील धोकेदायक इमारती,वाडे यांना नगर रचना विभागाकडून यापुर्वीच सर्व्हेक्षण करुन धोकेदायक वाडे उतरवून घेण्याबाबत नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. उच्च न्यायालयाच्या याचिका क्र. १९३५ मधील निर्देशानुसार नोटीसा बजाविणे, पोलिस विभागाची मदत घेणे, विद्युत व पाणीपुरवठा खंडीत करणे आदि बाबत मनपा आयुक्त यांनी विभाग प्रमुखांच्या बैठकीत विभागीय अधिकारी यांच्यामार्फत कारवाई बाबत सुचित केलेले आहे.