मुंबई : एका नराधम बापाने आणि भावानेच आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार एका अल्पवयीन मुलीने धारावी पोलिसांत दिली आहे. या मुलीच्या तक्रारीवरुन तिच्या नराधम बापाला आणि भावाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दहावी मध्ये शिकणाऱ्या या मुलीने हिंमत दाखवत शाळेतील तिच्या शिक्षक आणि मुख्याध्यापकांशी संपर्क साधला आणि त्यांनी एका संस्थेच्या मदतीने पोलीसांत तक्रार दाखल करण्यास मदत केली.


तक्रारदार तरुणीने पोलिसांना सांगितले आहे की, 2019 पासून तिचे लैंगिक शोषण सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी पीडित मुलगी तिच्या वडिलांच्या पिशवी बनवण्याच्या कारखान्यात झोपली असताना तिच्या वडिलांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच, 25 जानेवारी 2019 रोजी, ती घरी असताना तिच्या भावाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तिने केला आहे.  


पीडित मुलगी तिच्या वडिलांना आणि भावाला घाबरत होती आणि तिच्या समस्या कोणाशीही सांगण्यास कचरत होती.  तिने तिच्या आईचीही मदत घेतली नाही. पीडित मुलगी तिच्या धाकट्या बहिणीसाठी घाबरली होती आणि शेवटी तिने बोलण्याचं धाडस केले. ती तिच्या शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापकांकडे गेली आणि तिच्या सोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला.


एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती सविस्तरपणे ऐकल्यानंतर शाळेच्या शिक्षकांनी स्थानिक एनजीओ 'स्नेहा'शी संपर्क साधला आणि त्या मुलीच्या प्राथमिक समुपदेशनानंतर धारावी पोलिसांशी संपर्क साधला.


आलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी सायन रुग्णालयात मुलीची वैद्यकीय तपासणी केली आणि सोमवारी एफआयआर नोंदवला. त्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीचे वडील आणि 20 वर्षीय भावाला तात्काळ अटक केली. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 376 (2) (f), 376(2) (n) आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायदा कलम 4, 6, 8, 10 आणि 12 अन्वये  दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


महत्त्वाच्या बातम्या :