विरार : जादूटोण्याच्या नावाखाली एका भोदूबाबाने स्वतःच्या बांधकाम व्यावसायिक भागीदारालाच 48  लाखाचा गंडा घातल्याची घटना विरार मध्ये घडलीय. यानंतर त्या संबंधित बांधकाम व्यावसायिकाचा मृत्यू झाला आहे. विरार पोलिसांनी या भोंदूबाबाला अटक केली आहे.   


या भोंदूबाबाने कुटुंबाचं काहीतरी बरंवाईट होईल अशी भिती घालून त्या व्यावसायिकाला पूजाअर्चा करायला लावली. या गोष्टी अति झाल्यामुळे त्या व्यावसायिकाला आजाराने ग्रासलं आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. विरार पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.  


विरारमधील एक हसतं खेळतं कुटुंब अंध्दश्रद्धेमुळं उद्ध्वस्त झालं आहे. विरारच्या गासकोपरी येथे राहणारे चंद्रदीप स्वामी हे बांधकाम व्यावसायिक होते. त्यांच विरारलाच राहणाऱ्या भोंदूबाबा मोहम्मद समीर अब्दुल शकुर उर्फ समीर कादरी याच्याशी व्यावसायिक मैत्री झाली. दोघेही कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये भागीदार होते. स्वामींचा स्वभाव अंधश्रद्धाळू असल्याचं ओळखून समीर कादरीने त्याचा फायदा घेतला. धंद्यात बरकतं पाहिजे असेल तर पूजा अर्चा, होम हवन करावं लागेल असं सांगितलं. आणि मग काय रात्री दोन ते अडीच वाजेपर्यंत बंद खोलीत धुप, अगरबत्ती,पूजा करुन, धुराच्या गर्द खोलीत स्वामी राहायचे. त्या धुराचा परिणाम असा झाला की, त्यांना ट्युमर आणि कॅन्सर सारखा जीवघेणा आजार जडला आणि त्यातच त्यांचा 14 सप्टेंबर 2021 रोजी मृत्यू झाला.


चंद्रदीप स्वामी यांच्या मृत्यूनंतर त्यांनी आपल्या हाताने लिहलेली हिशोबाची डायरी  कुटुंबियांना सापडली आणि या भोंदूबाबाचा भांडाफोड झाला. या बाबाने चंद्रदीप स्वामी यांच्याकडून धार्मिकतेच्या नावाखाली थोडं थोडकं नव्हे तर 48 लाख रुपये लुटल्याचं समोर आलं आहे. स्वामींच्या कुटुंबियांनी भोंदूबाबाच्या विरोधात विरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 


या भोंदूबाबाने स्वामींच्या मुलीशीही असभ्य वर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. विरार पोलिसांनी भोंदूबाबा विरोधात आर्थिक फसवणूक, जादूटोणा प्रतिबंधक कायदा आणि मुलीच्या तक्रारीवरुन विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन त्याला गजाआड केलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या :