Akola Police Crime: अकोला स्थानिक गुन्हे शाखेत शेगाव येथील सराफावर झालेल्या अत्याचार प्रकरणात मोठी कारवाई झाली आहे. याप्रकरणी पाच लोकांवर अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे दाखल झालेल्यांमध्ये सहायक पोलीस निरिक्षक नितीन चव्हाण, पोलीस शिपाई शक्ती कांबळे, संदीप काटकर, एक डॉक्टर आणि आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचा (FIR Filed Against Policemens) समावेश आहे. अकोला न्यायालयाने या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. यावर्षी जानेवारीमध्ये सोने चोरी प्रकरणात संशयित म्हणून आणलेल्या सराफावर पोलीस कोठडीत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पिडीत सराफानं केला होता. यासोबतच उकळतं पाणी पायावर टाकल्याने पाय जळाल्याचा आरोपही पीडित सराफाने केला होता. या संपुर्ण प्रकरणाचा 'एबीपी माझा"नं सातत्यानं  पाठपुरावा केला होता. या प्रकरणात आतापर्यंत एपीआय नितीन चव्हाणची पदावनती (Demotion) करण्यात आली आहे. तर तीन पोलीस शिपायांच्या बडतर्फीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. 


न्यायालयाने दिले गुन्हे दाखल करण्याचे आदेश  


या प्रकरणातील सर्व बाबी तपासत अखेर सोमवारी याप्रकरणी एपीआय नितीन चव्हाण , पोलीस कर्मचारी शक्ती कांबळे, संदीप काटकर, चुकीचा मेडिकल अहवाल तयार करणारा अज्ञात डॉक्टर आणि अन्य एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश अकोला न्यायालयाने सिटी कोतवाली पोलिसांना दिलेत. या प्रकरणातील पोलीस कर्मचारी शक्ती कांबळे, संदीप काटकर यांच्यासह अनोळखी डॉक्टर आणि आणखी एका विरुद्ध तब्बल 23 कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत. सोबतच 9 जानेवारी 2022 ते 18 जानेवारी 2022 या कालावधीतील स्थानिक गुन्हे शाखेच्या आवारातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेणे, त्याचबरोबर अपिलार्थी यांच्या निवासस्थानावरील 9 जानेवारी 2022 या दिवशीचे सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेणे आणि प्रकरणाचा तपास करून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे आदेशात नमूद केले आहे. याप्रकरणी फिर्यादीच्या वतीने ॲड. आर. डी. वर्मा यांनी कामकाज बघितले. 


या कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्याचे दिले आदेश


377, 354, 341, 343, 348, 357, 358, 362, 368, 294, 324, 326, 330, 331, 447, 452, 352, 201, 504, 506, 509 आणि 34, 120-ब या कलमान्वये गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.


काय आहे नेमके प्रकरण? 


9 जानेवारी 2022 रोजी अकोला स्थानिक गुन्हे शाखेनं शेगावातील एका सराफा व्यावसायिकाला सोने चोरी प्रकरणात अटक केली होती. सहायक पोलीस निरिक्षक नितीन चव्हाण आणि शिपाई शक्ती कांबळे यांनी शेगावात अटकेची कारवाई केली होती. चोरीचे सोने खरेदी प्रकरणातील या संशयित शेगावतील प्रसिद्ध सराफा व्यावसायिकाला रात्री 3 वाजता शेगावातून अटक करण्यात आली होती. मात्र, ही अटक, त्यानंतरची त्याची पोलीस कोठडी, पोलीस कोठडीतील त्याच्यासोबत झालेल्या अमानुषततेचा आरोप यामुळे अकोला स्थानिक गुन्हे शाखा पार अडचणीत सापडली आहे.  शेगावातून अकोल्यात आणतांना आरोपी सराफाला प्रचंड मारहाण करण्यात आल्याचं पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. यासोबतच तोंडावर आणि अंगावर हे दोन पोलीस कर्मचारी थूंकल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे. रविवारी आरोपी सराफाला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. रविवार आणि सोमवार या दोन दिवसांत आरोपी सराफाला एपीआय चव्हाण आणि काँस्टेबल कांबळे याने उलटे करून मारहाण केल्याचा आरोप पोलीस तक्रारीत करण्यात आला आहे. या तक्रारीत करण्यात आलेले अत्याचाराचे आरोप अक्षरश: अंगावर काटा आणणारे आहेत. 


पोलीस कोठडीत अनैसर्गिक लैंगिक अत्याचार, पायावर उकळतं पाणी टाकल्याचा आरोप


पोलीस कोठडीत आरोपी सराफाला अमानुषपणे मारहाण झाल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. 'थर्ड डिग्री' वापरतांना चव्हाण आणि शक्ती कांबळेंनी अक्षरश: सर्व मर्यादा ओलांडल्यात. सोने चोरीच्या प्रकरणात आधीच अटकेत असलेल्या दोन आरोपींना सराफा व्यावसायिकावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्यास या दोघांनी भाग पाडल्याचा गंभीर आरोप पोलीस अधिक्षकांना दिलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. यानंतर पायावर जास्त मारहाण झाल्याने पायावर व्रण दिसत होते. गरम पाण्याने व्रण मिटावेत म्हणून सराफाच्या पायावर गरम पाणी म्हणून उकळतं पाणी टाकण्यात आलं. यामूळे त्यांचा पाय गंभीररित्या भाजल्या गेला आहे. आपली चुक झाकण्यासाठी पोलिसांनी त्यांना घरीच पाणी सांडलं हे सांगण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. यावेळी तोंड उघडलं तर एनकाऊंटर करण्याची धमकी पोलिसांनी दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पायाला गंभीर दुखापत झालेल्या सराफा व्यावसायिकाच्या भाजलेल्या पायावर अकोल्याच्या एका खाजगी रूग्णालयात बुधवारी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सध्या त्यांच्यावर अकोल्यातच उपचार सुरू आहे. 


पीडित सराफानं अकोला पोलिसांवर केलेले आरोप : 


1) अटक केल्यानंतर शेगावतील घरी कुटुंबियांना अश्लिल शिवीगाळ. 
2) गाडीत अमानूष मारहाण आणि तोंडावर थुंकल्याचा आरोप. 
3) सोने चोरीतील इतर दोन आरोपींना अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करायला लावल्याचा एपीआय चव्हाण आणि कॉन्स्टेबल कांबळेवर आरोप. 
4) मारल्याने पाय सुजल्यामूळे पायावर उकळतं पाणी टाकल्यानं पाय जळाल्याचा आरोप. 
5) कोर्टासमोर मारहाण झाल्याचं न सांगण्यासाठी दबाव. जबाबाच्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्याचा आरोप. 


'एबीपी माझा'नं केला सातत्यानं पाठपुरावा :


या संपुर्ण प्रकरणाचा 'एबीपी माझा'नं सातत्यानं पाठपुरावा केला होता. या प्रकरणातील अनेक तथ्य आणि पैलूही 'माझा'मूळेच उजेडात आले होतेय. 'माझा'च्या पाठपुराव्यामुळेच आमची न्यायाची लढाई अधिक ताकदीन लढू शकल्याची भावना पीडित सराफा व्यावसायिकाच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. 


आधी प्रकार नाकारणाऱ्या पोलिसांकडून नंतर दोषींवर कारवाईचा बडगा : 


या प्रकरणात आधी अकोला पोलिसांनी सर्व आरोप स्पष्टपणे नाकारले होते. मात्र, पिडीत सराफाच्या कुटूंबियांनी हे प्रकरण सातत्यानं लावून धरत अनेक पुरावे न्यायालयासमोर आणि पोलिसांसमोर सादर केलेत. याप्रकरणी दोन चौकशी समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. यात बुलडाण्याच्या अतिरिक्त पोलीस अधिक्षकांच्या अहवालात गंभीर बाबी नमूद केल्या होत्या. या अहवालाच्या आधारावर या प्रकरणी एपीआय नितीन चव्हाणसह शिपाई शक्ती कांबळे, संदीप, काटकर, विरेंद्र लाड, गिता अवचार आणि आणखी एकाला निलंबित करण्यात आलं होतं. पुढे याच प्रकरणात एपीआय नितीन चव्हाण यांची पदावनती करण्यात आली आहे. तर तिन पोलीस शिपायांच्या बडतर्फीची प्रक्रिया सध्या सुरू आहे.