Akola Crime : अकोल्यातील (Akola) सराफा व्यावसायिकावर पोलीस कोठडीत (Police Custody) झालेल्या अनैसर्गिक अत्याचार प्रकरणी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ (Rajnish Seth) यांनी अतिशय कठोर पावलं उचलल्याची विश्वसनीय माहिती प्राप्त झाली आहे. या प्रकरणात एकूण सहा पोलीस शिपायांना बडतर्फ केल्याची नोटीस पोलीस महासंचालकांनी दिली आहे. तर दोषी सहाय्यक पोलीस निरीक्षकाची पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदावनत म्हणजे डिमोशन करण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे. यासोबतच स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुखांना तीन पगारवाढ रोखण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. या सर्वांना नोटीसला उत्तर देण्यासाठी आठवडाभर ते दहा दिवसांचा कालावधी देण्यात आल्याची माहिती आहे.


काय आहे प्रकरण?
जानेवारी महिन्यात हे प्रकरण समोर आलं होतं. अकोला पोलिसांच्या (Akola Police) स्थानिक गुन्हे शाखेने सोने चोरीच्या प्रकरणात शेगावच्या एका सराफा व्यावसायिकाला ताब्यात घेतलं होतं. चोरीचं सोनं खरेदी केलं म्हणून पोलिसांनी सराफाला अटक केली. न्यायालयाने व्यापाऱ्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. "कोठडीत आणताना पोलिसांनी गाडीतच मारहाण केली. तसंच पोलिसांनी आपल्याला उलटे टांगून मारहाण केली. यानंतर अटकेत असताना आधीच कोठडीत असलेल्या दोन आरोपींना आपल्यावर नैसर्गिक अत्याचार करण्यास अकोला पोलिसांनी भाग पाडलं," असा आरोप या व्यापाऱ्याने केला होता. एवढंच नाही तर या सराफाच्या पायावर उकळतं पाणी ओतल्याने त्याचा पाय गंभीररित्या भाजला होता. जामीन मंजूर झाल्यानंतर या व्यापाऱ्याने अकोला पोलीस अधीक्षक आणि सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.


'एबीपी माझा'च्या पाठपुराव्याला यश
एबीपी माझाने या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. पोलीस महासंचालकांनी केलेल्या कारवाईनंतर या पाठपुराव्याला यश आलं आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात 'एबीपी माझा'ने अकोल्यातील हे मोठं प्रकरण उघडकीस आणलं होतं. रक्षकच कसे क्रूर बनतात याचं उदाहरण म्हणजे हे प्रकरण होतं.या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा 'एबीपी माझा'ने सातत्याने केला होता. परिणामी सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बुलडाण्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकांची नेमणूक केली केली होती. यानंतर या प्रकरणात पाच पोलीस शिपाई आणि सहायक पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात आलं होतं. 


संबंधित बातम्या


Akola: कोठडीत पोलिसांनी मारहाण आणि अनैसर्गिक अत्याचार केल्याचा व्यापाऱ्याचा आरोप; अकोल्यातील धक्कादायक घटना


अकोल्यात पोलीस कोठडीत आरोपीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार?


अकोल्यात आरोपीवर कोठडीत अनैसर्गिक लैंगिक अत्याचार प्रकरण; एकाच दिवसात पाच जणांचे निलंबन