Kalyan-Dombivli Crime news : लैंगिक अत्याचाराला कंटाळून नैराश्यातून एका तरुणीने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केल्याची घटना कल्याणात उघडकीस आली होती. याप्रकरणी कोलशेवाडी पोलिसांनी आठ जणांवर गुन्हे दाखल करत अटक केली. या गंभीर प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी याप्रकरणी कडक कारवाई करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य महिला आयोगास सादर करण्याचे निर्देश ठाणे पोलिसांना दिले आहेत. याबाबत रुपाली चाकणकर यांनी ट्विट केलं आहे.


एका तरूणीला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत सात तरुण गेल्या दीड वर्षापासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. या गैरकृत्यमध्ये एका तरुणीचा सहभाग होता. या त्रासाला कंटाळून नैराश्यातून या तरुणीने राहत्या इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्याने शहर हादरले होते. याप्रकरणी पीडितेच्या मोबाईलमधील सुसाईड नोटचा तपास करत कोळशेवाडी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तातडीने कारवाई करत पोलिसांनी आठही जणांना बेड्या ठोकल्या. आरोपीमध्ये कल्याण मधील धनदांडग्या बिल्डरची मुलं असल्याने आमच्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप  मयत पीडितेच्या कुटुंबीयांनी केला होता. या प्रकरणी महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून ट्विटद्वारे माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी याप्रकरणाची माहिती घेतली असून याप्रकरणी कडक कारवाई करण्याचा आदेश दिलाय. त्याशिवाय केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य महिला आयोगास सादर करण्याचे निर्देश ठाणे पोलिसांना दिले आहेत. 






आणखी वाचा 
पोलिसानेच केली प्रेयसीची हत्या, मृतदेह गाडीत घेऊन दोन दिवस फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या 
यूट्यूबवर चोरी कशी करायची शिकला, 10 लाखांची घरफोडी केली, नालासोपाऱ्याच्या 'पठ्ठ्या'ला यूपीत बेड्या