Crime News : मनोरंजन तसंच एखादी माहिती मिळवण्यासाठी आजकाल यूट्यूबचा वापर सगळेच करतात. पण याच यूट्यूबवरुन चक्क चोरी करायला एक पठ्ठ्या शिकला आणि त्याने 10 लाखांची घरफोडी देखील केल्याची धक्कादायक घटना नालासोपारा येथे घडली आहे. आरोपीला पोलिसांनी उत्तरप्रदेशातून अटक देखील केली असून त्याने युट्यूबवरून चोरीचे धडे घेतल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.


सध्याच्या काळात सर्वचजण इंटरनेटवर इतके अवंलंबून आहेत की, रोजच्या जीवनातील साध्या साध्या गोष्टींसाठीही इंटरनेटची गरज आपल्याला लागते. त्यात इंटरनेटचा अविभाज्य भाग असणाऱ्या यूट्यूबचा (Youtube) वापरही मोठ्या प्रमाणात सर्वजण करत असतात. आधी केवळ मनोरंजानासाठी असणाऱ्या यूट्यूबला आता माहितीचा स्त्रोत म्हणून वापरलं जातं. पण याच यूट्यूबच्या मदतीने नालासोपाऱ्यात राहणाऱ्या एकाने घराचे टाळे कसे तोडायचे, याचे धडे घेत 10 लाखांची घरफोडी केली आहे. या आरोपीला आचोळे पोलिसांनी उत्तर प्रदेशवरून अटक केली आहे. दिलशान शेख असं या आरोपीचं नाव आहे. 


नालासोपाऱ्यात झाली चोरी


नालासोपाऱ्यातील रश्मी रेसिडेन्सी या इमारतीत घरात घुसून 10 लाखांच्या दागिन्यांची चोरी या चोराने 5 जून रोजी केली होती. घरफोडी करून हा चोरटा फरार झाला होता. त्याचा शोध पोलिसांकडून सुरू होता. घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून आरोपीचे वर्णन आणि पत्ता मिळवला. त्यानंतर आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी दोन पथके तयार केली. एक पथक गुजरात आणि दुसरं पथक उत्तर प्रदेश येथे रवाना ही करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी उत्तर प्रदेशमधून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीकडून 9 लाख 75 हजारांचा मुद्देमाल ही जप्त करण्यात आला आहे. आरोपीची ही पहिलीच चोरी असल्याचंही प्राथमिक माहिती समोर आली आहे.  


इतर महत्त्वाच्या बातम्या