Ashish Nehra : दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध तिसरा टी20 सामना जिंकल्यानंतर आता मालिकेत भारताने आपलं आव्हान जिवंत ठेवलं आहे. दरम्यान हा तिसरा सामना जिंकण भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं होतं, कारण हा सामना द. आफ्रिकेने जिंकला असता तर मालिकेत त्यांनी 3-0 ची विजयी आघाडी घेतली असती. त्यामुळे हा सामना जिंकणं भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं होतं. दरम्यान या सामन्यात भारताला विजय मिळवून देण्यात सर्वात महत्त्वाची कामगिरी युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) केली असल्याची प्रतिक्रिया भारताचा माजी दिग्गज गोलंदाज आशिष नेहरा याने दिली आहे.
दरम्यान या सामन्यात भारतीय फिरकीपटू चहलने 4 ओव्हर टाकत 20 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. यावेळी त्याने ड्वेन प्रीटोरियस, रसी वॅन डर डुस्सेनन आणि हेनरी क्लासेन हे महत्त्वाचे विकेट्स घेतले. यामुळेच चहलला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देखील देण्यात आला असून नेहरानेही त्याचं कौतुक केलं आहे.
'चहलच्या लाइन आणि लेंथमध्ये शानदार बदल'
माजी भारतीय गोलंदाज आशिष नेहरा युजवेंद्र चहलचं कौतुक करताना म्हणाला की, ''चहलने त्याच्या लाईन आणि लेंथमध्ये शानदार बदल केले आहेत. यामुळेच त्याला हे यश मिळत आहे. दुसऱ्या सामन्यात चहलने ज्या प्रकारे हेनरी क्लासेनविरुद्ध गोलंदाजी केली होती, तेव्हा त्याची लाईन आणि लेंथ बरोबर नव्हती. पण तिसऱ्या सामन्यात त्याने यामध्ये दमदार बदल करत क्लासेनला बादही केलं आणि सर्वात चांगली गोलंदाजीही केली.''
भारताचा 48 धावांनी विजय
दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. मैदान गोलंदाजांसाठी अधिक फायदेशीर असल्याने आधीच दोन सामने गमावलेल्या भारताला चांगली धावसंख्या गाठता येईल असे वाटत नव्हते. पण सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि ईशान किशन यांच्या फलंदाजीने हे चित्रच पलटले. ऋतुराजने 35 चेंडूत 57 तर ईशानने 35 चेंडूत 54 धावा करत संघाची धावसंख्या वाढवली. याशिवाय हार्दिकनेही महत्त्वपूर्ण अशा 31 धावा केल्या. ज्यामुळे भारताने 179 धावा स्कोरबोर्डवर लावत दक्षिण आफ्रिकेसमोर 180 धावांचे लक्ष्य ठेवले.
180 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवातच खराब झाली. अक्षर पटेल, हर्षल पटेलसह चहलने सुरुवातीपासून उत्तम गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेला धावसंख्या वाढवू दिली नाहीच उलट एका मागोमाग एक गडी देखील बाद केले. द. आफ्रिकेकडून हेनरीज क्लासेन याने सर्वाधिक 29 धावा केल्या. तर भारताकडून आयपीएल गाजवणाऱ्या चहल आणि हर्षल पटेलने भेदक गोलंदाजी करत सर्वाधिक विकेट्स घेतले. यावेळी हर्षलने 4 तर चहलने 3 गडी बाद केले. याशिवाय अक्षर पटेल आणि भुवनेश्वर कुमार यांनीही एक-एक विकेट घेतली.
हे देखील वाचा-