Maharashtra Ulhasnagar Crime News : ठाणे पोलीस आयुक्तालयातील एका पोलिसाने आपल्या प्रेयसीची हत्या केल्याचा प्रकार समोर आलाय. धक्कादायक म्हणजे ज्या गाडीत त्याने प्रेयसीची हत्या केली, त्याच गाडीत मृतदेह घेऊन तो दोन दिवस राज्याच्या विविध शहरात फिरत होता. उल्हासनगर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे अखेर या पोलिसाला आणि त्याच्या साथीदाराला बेड्या ठोकल्या आहेत. अनेक आरोपीना बेड्या ठोकणारा पोलिसच हत्येच्या आरोपीखाली जेरबंद झाल्याने हा पोलीस वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.


ठाणे पोलीस आयुक्तालयातील पोलीस कर्मचारी सचिन खाजेकर याने साथीदाराच्या मदतीने प्रेयसीची हत्या केली. सचिन खाजेकर याने 14  तारखेला प्रेयसी आशा मोरेची आपल्या कारमध्ये गळा दाबून हत्या केली. धक्कादायक म्हणजे आशाची हत्या ज्या कार मध्ये त्याने केली होती, त्या कारमध्येच तिचा मृतदेह घेऊन तो नाशिक, भिवंडी, ठाणे आशा विविध शहरात दोन दिवस मृतदेह घेऊन फिरत होता. अखेर उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत आल्यानंतर त्याने आपल्या मेव्हण्याला हत्या केल्याची माहिती देत मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सांगितले. त्याच्या मेव्हण्याने आणखी एका ओळखीच्या व्यक्तीला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करण्यासाठी फोन केला. मात्र ज्याला फोन करून सांगितले त्यानेच पोलिसांना माहिती देत या हत्येचा उलगडा करण्यासाठी मदत केली. विठ्ठलवाडी पोलीस पथकाने खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या ठिकाणी जाऊन पोलीस सचिन खाजेकर सह त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले. तसेच  महिलेचा मृतदेह ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला.
 
सचिन खाजेकर हा औरंगाबादेत पोलीस आयुक्तालयात एक वर्षांपूर्वी कामाला असताना आशा मोरे सोबत त्याचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते. याच दरम्यान ती त्याला घरी घेऊन जाण्यासाठी वारंवार तगादा लावत होती, शिवाय पैशाची मागणी देखील करत होती. त्यामुळेच सचिन याने ठाणे पोलीस आयुक्तालयात बदली करून घेतली. मात्र आशा येथे देखील आली, आणि तिने पैशाची मागणी केली. अखेर 14 तारखेला सचिन याने आशाला बोलवून घेत तिची कार मध्ये गळा दाबून हत्या केली. मात्र हत्या केल्यानंतर मृतदेह कशी विल्हेवाट लावायची हे त्याला सुचत नव्हतं. त्यामुळे कारमधून तिचा मृतदेह विविध शहरात फिरवला. मात्र पोलिसांच्या खबऱ्यामुळे त्याचे बिंग फुटले. दरम्यान आता सचिनने आपल्या बहिणी सोबत लॉक डाऊनच्या काळात लग्न केल्याची माहिती हत्या झालेल्या आशाच्या बहिणीने दिलीय.