पुणे : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकींची हत्या घडवून आणणारा गॅंगस्टर लॉरेन्स बिष्णोई हा गेली काही वर्षे देशातील वेगवेगळ्या तुरुंगांमधे बंदिस्त असतानाही त्याची टोळी बाहेर सक्रिय आहे. त्यासाठी त्याने ऑनलाईन रिक्रुटमेंटचा मोठ्या चलाखीने उपयोग केलाय. बिश्नोई आणि त्याच्या टोळीच्या सोशल मीडियातील प्रतिमेला भुलून देशातील शेकडो तरुण त्याच्या टोळीत सहभागी होतायत आणि बिष्णोईच्या ऑनलाईन इशाऱ्यावरुन हत्या करत आहेत. अंडरवर्ल्डच्या या नव्या ऑनलाईन व्हर्जनवर प्रकाश टाकणारा एबीपी माझाचा हा विशेष रिपोर्ट.


बाबा सिद्दीकींची हत्या केल्याच्या आरोपावरुन मुंबई पोलिसांनी गुरमेल सिंग, धर्मराज कश्यप आणि प्रवीण लोणकरला अटक केली आहे. तर शिवकुमार गौतम, मोहम्मद झीशान अख्तर आणि शुभम लोणकर हे या हत्येतील इतर आरोपी फरार झालेत. गुजरातमधील साबरमती तुरुंगात बंदिस्त असलेल्या लॉरेन्स बिष्णोईच्या सांगण्यावरुन त्यांनी ही हत्या घडवून आणल्याचे बोललं जातंय. 


या आरोपींपैकी कुणीही लॉरेन्स बिष्णोईला कधी भेटलेलं देखील नाही. मात्र तरीही बिष्णोईच्या सांगण्यावरुन त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या बाबा सिद्दीकींची हत्या केलीय. या आरोपींना लॉरेन्स बिष्णोईबद्द्ल माहिती मिळवली ती सोशल मीडियाच्या माध्यमातून. लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीकडून सोशल मीडियावर टाकले जाणारे लॉरेन्सचे फोटो आणि त्याच्याबद्दलच्या पोस्ट पाहून नुकतेच वयात आलेले असे तरुण बिष्णोईच्या जाळ्यात अडकताना दिसतात.


लॉरेन्स बिष्णोईच्या प्रतिमेला भुलून तरूण सहभागी


लॉरेन्स देशातील वेगवेगळ्या तुरुंगात बंदिस्त तर त्याचा भाऊ अनमोल बिष्णोई आणि साथीदार गोल्डी ब्रार परदेशात फरार झालेले. पैशांसाठी हत्या, अपहरण, खंडणी असे उद्योग करणाऱ्या बिष्णोईने आपल्या कृत्यांवर पांघरुन घालता यावं यासाठी सोशल मीडियाचा वापर सुरु केला. 


बिष्णोई समाजासाठी पवित्र असलेल्या चिंकारा हरणांना मारणाऱ्या सलमान खानला मारुन आपल्याला बदला घ्यायचाय असं सांगत बिष्णोई आणि त्याच्या टोळीने सोशल मीडियाचा माध्यमातून त्यांची आभासी प्रतिमा निर्माण केलीय. या  प्रतिमेला भुलून हे आरोपी त्याच्या टोळीत सामील होतायंत. देशातील वेगवेगळ्या राज्यातील सातशेहून अधिक तरुणांची बिष्णोईने त्याच्या टोळीत अशी ऑनलाईन रिक्रुटमेंट केलीय. 


सिद्धु मुसेवालाला मारलं


काही महिन्यांपूर्वी पंजाबी पॉप गायक सिद्धु मुसेवालाची लॉरेन्स बिष्णोईने अशीच हत्या घडवून आणली होती. त्या प्रकरणात पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील संतोष जाधव, जुन्नर तालुक्यातील सिद्धेश कांबळे उर्फ महाकाल आणि सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील नवनाथ सूर्यवंशी या तरुणांना पंजाब पोलिसांनी अटक केली होती. पंजाब आणि हरियाणापासून शेकडो किलोमीटर अंतरावरील हे तरुण बिष्णोईच्या ऑनलाईन प्रतिमेला भुलूनच त्याच्या टोळीत सहभागी झाले होते. या अशा तरुणांचा उपयोग करुन बिष्णोईने हत्या, खंडणी आणि अपहरण यासारख्या गुन्ह्यांचा सपाटा लावलाय. 


बिष्णोईला तुरुंगात कोण मदत करतंय?


मूळ मुद्दा आहे तो देशातील वेगवेगळ्या तुरुंगांमध्ये बंदिस्त असलेल्या लॉरेन्स बिष्णोईला मोबाईल, इंटरनेट आणि इतर सुविधा कोणाच्या आशीर्वादाने आणि का मिळतायंत . लॉरेन्सच्या प्रतिमेचा आपल्या राजकारणासाठी उपयोग व्हावा यासाठी जाणीवपूर्वक त्याला आणि त्याच्या टोळीला मोठं केलं जातंय का? 


टोळीत नव्या शूटर्सची भरती असो किंवा त्यांना सूचना देणं असो किंवा पैशांची देवाणघेवाण असो, बिष्णोई टोळी सगळं काही ऑनलाईन पद्धतीने करतेय. बिष्णोईसाठी काम करणाऱ्या अशा बहुतांश तरुणांची आधी कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्यानं त्यांना आवर घालणं पोलिसांठी आव्हान ठरतंय . 


लॉरेन्स बिष्णोईच्या ऑनलाईन प्रतिमेला भुलून काहीजण जसे त्याच्या टोळीत सहभागी होतायंत तसेच अनेकजण त्याच्याबद्दल सहानुभुती बाळगून आहेत. सोशल मीडियात बिष्णोईचे हे सहानुभुतीदार चांगलेच आक्रमक आहेत. पण बिष्णोई हा खलिस्तान या फुटिरतावादी चळवळीला पाठिंबा देणारा असून तो एक देशद्रोही आहे असं आपल्या देशाच्या एनआयएने त्यांच्या अहवालात म्हटलं आहे. त्यामुळे हा अहवाल बिष्णोईच्या सहानुभुतीदारांचा भ्रमनिरास करणारा, आभासी दुनियेतून त्यांना जागे करुन वास्तवाची जाणीव करुण देणारा ठरु शकतो. कारण गुन्हेगाराला न कोणती जात असते, ना धर्म. गुन्हेगार हीच त्याची एकमेव ओळख असते. 


ही बातमी वाचा :