लातूर : लातूर येथील वसतीगृहात राहणाऱ्या 15 वर्ष वयाच्या मुलीने वसतीगृहाच्या इमारतीवरुन उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यानंतर परिवारातील नातेवाईक विविध सामाजिक संघटना यांनी लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात गर्दी केली. ही आत्महत्या नव्हे तर, घातपात आहे, अशी शंका नातेवाईकांकडून व्यक्त करण्यात आली. दोषी लोकांना शासन होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी नातेवाईकांनी भूमिका घेतली होती. मृतदेहाची उत्तरीय तपासणी लातूर झाल्यानंतर ही पुन्हा सोलापूरला होत आहे. या घटनेला 35 पेक्षा अधिक तास झाले आहेत. मृतदेह संध्याकाळी सोलापूरकडे पाठवण्यात आला.


नववीत शिकणाऱ्या मुलीचं टोकाचं पाऊल


सायली सिद्धार्थ गायकवाड ही 14 ते 15 वर्षाची मुलगी, नववी वर्गात शिकत होती. काहीच दिवसांपर्वी आठवीचा निकाल लागला. लातूरच्या महात्मा गांधी विद्यालय येथे तिचे शिक्षण सुरू होते. मागील एक वर्षापासून ती लातूरच्या कस्तुरबा कन्या छात्रालयात राहत होती. नववीच्या वर्गात जाण्याचा उत्साह तिच्यात होता. यासाठी चाकूर तालुक्यातील आपल्या गावावरून ती लातूरला दाखल झाली. दोनच दिवसापूर्वी पहाटेच्या वेळी तिने वसतीगृहाच्या दुसऱ्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला तात्काळ लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. उपचार सुरू असताना शुक्रवारी तिचा मृत्यू झाला. 


वसतीगृहाच्या इमारतीवरुन उडी, उपचारादरम्यान मृत्यू


घटनेची माहिती कळताच सायलीचे आई-वडील, आजी-आजोबा लातूर येथे आले. अनेक सामाजिक संघटनांनी लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाकडे धाव घेतली. ही आत्महत्या किंवा अपघात नसून घातपात आहे. पोस्टमार्टममध्ये ते दिसून येईल. दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी करण्यात येत होती. विवेकानंद पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत होते. लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात पोस्टमार्टम करण्यात आलं. मात्र नातेवाईकांनी इन कॅमेरा पोस्टमार्टम करण्याची मागणी लावून धरली. घातपाताची शक्यता व्यक्त केली जात होती, जोपर्यंत मागणी मान्य केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली. पोलिसांनी आता मृतदेह उत्तर तपासणीसाठी सोलापूरकडे पाठवला आहे. 


घातपात असल्याचा कुटुंबियांचा आरोप


सायलीचे आई-वडील मागील काही वर्षापासून विभक्त राहतात. त्यांच्यात अनेक कारणावरून तंटे होत असतात. सायलीचा सांभाळ योग्य झाला पाहिजे, तिचं शिक्षण योग्य ठिकाणी झालं पाहिजे, यासाठी सायलीच्या आजोबांनी लातूर येथील वसतीगृहात तिच्या शिक्षणाची सोय केली. मागील एक वर्षापासून ती लातूर येथील वसतीगृहात शिक्षण घेत होती. अवघ्या काही दिवसांपूर्वीच ती लातूरच्या वसतीगृहात पुन्हा आली. मात्र घरी असलेल्या वादाला कंटाळून तिने आत्महत्या केली असावी, अशी माहिती समोर येते. 


पुढील तपासणीसाठी मृतदेह आता सोलापूरला पाठवला


कस्तुरबा कन्या छत्रालयाचे संचालक शंकर गुट्टे यांनी याबाबत माहिती देताना सांगितली की, तिच्या आजोबांना घरच्या परिस्थितीची आणि तिच्या मानसिकतेची संपूर्ण जाणीव होती. यातून ही दुर्दैवी घटना घडली आहे. मात्र त्यांच्या घरापासून विभक्त राहणाऱ्या सायलीच्या वडिलांनी आता बिनबुडाचे आरोप सुरू केले आहेत. विविध सामाजिक संघटना आणि सायलीचे वडील यांनी यात घातपात आहे. इन कॅमेरा पोस्टमार्टम केल्यानंतर सर्व माहिती रेकॉर्डवर येईल आणि दोषी समोर येतील असा विश्वास व्यक्त केला आहे. पोलिसांनी मृतदेह आता सोलापूरला पाठवला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


ब्रेकिंग! पासपोर्ट भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई! मुंबई, नाशिकमध्ये 33 ठिकाणी छापेमारी, पासपोर्ट अधिकारी आणि दलालांवर गुन्हे दाखल