मुंबई : सीबीआयकडून (CBI) मुंबई (Mumbai) आणि नाशिक (Nashik) परिसरात एकूण 33 ठिकाणी छापेमारी (CBI Raid) करण्यात आली आहे. सीबीआयने पासपोर्ट अधिकाऱ्यांवर आणि दलालांवर एकूण बारा गुन्हे दाखल केले आहेत. पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा सीबीआयचा दावा असून या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. मुंबईतील परेल, मालाड परिसरात सीबीआयकडून मोठी छापेमारी करण्यात आली आहे. 


पासपोर्ट भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई


बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट जारी केल्याचा  दावा सीबीआयकडून करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट जारी करुन त्या बदल्यात काही एजंटच्या माध्यमातून पासपोर्ट अधिकाऱ्यांच्या अकाउंटमध्ये थेट पैसे आल्याचेही सीबीआयने म्हटले आहे. मुंबईसह नाशिक परिसरात सीबीआयने मोठे सर्च ऑपरेशन राबवत संशयास्पद कागदपत्र हस्तगत केली आहेत.


मुंबई, नाशिकमध्ये 33 ठिकाणी छापेमारी


सीबीआयने शनिवारी मुंबईतील दोन पासपोर्ट सेवा केंद्रांवर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी मुंबई आणि नागपूरमधील अनेक ठिकाणी छापे टाकले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने पासपोर्ट सेवा केंद्र केंद्रांवर संयुक्तपणे छापेमारी केली, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार उघड झाला आहे. सीबीआयने आता या प्रकरणासंदर्भात अनेक एफआयआर नोंदवले आहेत.


सीबीआयने पासपोर्ट सहाय्यकांसह 32 आरोपींविरुद्ध 12 गुन्हे दाखल केले आहेत. पासपोर्ट सेवा केंद्रांचे पासपोर्ट सहाय्यक आणि दलाल यांच्यावर बनावट कागदपत्रांद्वारे पासपोर्ट बनवल्यास मदत केल्याचा आरोप आहे. सीबीआयने पासपोर्ट सहाय्यक वरिष्ठांसह 14 अधिकाऱ्यांविरुद्ध 12 गुन्हे दाखल केले आहेत. लोअर परळ आणि मालाडच्या पासपोर्ट सेवा केंद्रांवर (PSK) पासपोर्ट सहाय्यक आणि प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय (RPO) अंतर्गत कार्यरत PSK, लोअर परेल, मुंबई आणि PSK मालाड छापेमारी करण्यात आली.


पासपोर्ट सुविधा अधिकारी आणि दलालांकडून गैरव्यवहार


अधिकारी, पासपोर्ट सुविधा दलाल यांच्याशी संगनमताने भ्रष्टाचार करत असल्याचं सीबीआयने सांगितलं आहे. हे अधिकारी पासपोर्ट सुविधा एजंट्सच्या नियमित संपर्कात होते आणि अपुऱ्या किंवा अपूर्ण कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट जारी करण्याच्या बदल्यात किंवा पासपोर्ट अर्जदारांच्या वैयक्तिक तपशीलांमध्ये फेरफार करून पैसे कमावत होते. 26 जून रोजी परळ आणि मालाड येथील पासपोर्ट सेवा केंद्रावर सरकारच्या पासपोर्ट सेवा कार्यक्रम (PSP) विभागाच्या दक्षता अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. यावेळी संशयित अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील डेस्क आणि मोबाईल फोनचे रेकॉर्ड्स CBI टीमने तपासले. 


छापेमारीमध्ये सापडलेली कागदपत्रे, सोशल मीडिया चॅट्स आणि संशयित युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) आयडीच्या विश्लेषणातून पासपोर्ट सेवा केंद्राच्या (PSK) काही अधिकाऱ्यांकडून पासपोर्ट जारी करण्यासाठी तसेच पासपोर्ट सुविधा एजंट्सद्वारे लाच मागणारे आणि लाच घेणारे व्यवहार उघड झाले. अपुऱ्या किंवा बनावट कागदपत्रांवर आधारित पासपोर्ट देण्यासाठी अधिकाऱ्यांनी UPI पेमेंटद्वारे लाच स्वीकारल्याचं समोर आलं आहे.