लातूर : लातूरमधील (Latur) सम्राट चौकात एक धक्कादायक घटना घडली आहे. पश्चिम बंगलमधील तरुणीचा लातूरमध्ये अपघाती मृत्यू (Death) झाला आहे. ट्रॅव्हल्स आणि दुचाकीची जोरदार धडक झाल्याने बावीस वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येतेय. ही मुलगी घर मालकाच्या मुलाला शाळेत सोडायला जात असताना हा अपघात झाला. स्कुटीवरुन ही तरुणी आणि घरमालकाचा मुलगा सम्राट हा चौकातून जात होता. या तरुणीसोबत असणाऱ्या घर मालकाच्या मुलाला या अपघातात गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेबद्दल कळताचा त्या भागात एकच गर्दी जमा झाली. त्यानंतर मुलाला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले.
नेमकं काय घडलं?
मोसमी सुमोन देबनाथ ही बावीस वर्षाची तरुणी पश्चिम बंगालमधून लातूरमध्ये वास्तव्यास आली होती. ती जवळच्याच एका डालडा कंपनीच्या जवळ राहत होती. तिचे कुटुंब लातूर शहरात सोन्याचे दागिने बनवण्यासाठी कारागीर म्हणून काम करतात. सोमवार 18 डिसेंबर रोजी ती घर मालकाच्या चौदा वर्षांच्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी निघाली होती. त्यावेळी शहरातील सम्राट चौकात एका ट्रॅव्हल्सची आणि तिच्या स्कुटीची जोरदार धडक झाली.
ही धडक इतकी भीषण होती की मोसमीचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. तसेच या अपघातात गाडीवरील 14 वर्षांचा मुलगा हा गंभीर जखमी झाला आहे. मजीद चौधरी यांच्या घरात मोसमीचे कुटुंब मागील एका वर्षापासून काम करत होते. त्यांच्याच घरात ते भाड्याने राहत होते. चौधरी यांच्या कुटुंबातील चौदा वर्षीय मुलाला शाळेत सोडण्यासाठी निघालेल्या मोसमीचा दुर्दैवी अपघात झाला.
नाशिकमधील धक्कादायक घटना
भाच्याने मामाचा खून केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या पंचवटी परिसरात घडली आहे. बाबुलाल सोमा गावित हे गेल्या दोन महिन्यांपासून पंचवटीतील हिरावाडी परिसरात आपला भाचा मच्छिंद्रर माणभाव याच्याकडे राहत होते. शुक्रवारी दुपारच्या सुमारास 'तुझ्या मुलाच्या पायाला चटके लागले आहेत, त्याला दवाखान्यात दाखवायला तुझ्याकडे पैसे नाहीत. पण दारू प्यायला पैसे आहेत' असे मामा बोलल्याचा राग मच्छिंद्र याला आला. रागाच्या भरात मच्छिंद्र याने घरातील पलंगावर बसलेल्या आपल्या मामाला खाली जमिनीवर आपटले. तसेच प्लास्टिकची झाडाची कुंडी मामाच्या छातीत मारुन फेकली. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने मामाचा काही वेळातच मृत्यू झाला.