मुंबई : एकेकाळी कायदा आणि सुव्यवस्थेचे आदर्श उदाहरण ठरलेल्या महाराष्ट्राचा आता बिहार झालाय का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे कारण गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ (Maharashtra Crime) झालीय. नुकतंच ठाण्यात एका महिलेवर झालेला हल्ला, त्यानंतर आता ठाणे ग्रामीणचा मुरबाड येथील माजी पंचायत अधिकाऱ्याने एका व्यक्तीचे तलवारीने कापलेले हात या घटनांनी एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे. या दोन्ही प्रकरणानंतर राज्याती महिला सुरक्षित आहेत का असा सवालही उपस्थित केला जात आहे.


ठाण्यात झालेल्या प्रकरणात एमएसआरडीसी चे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांचा पुत्र अश्वजीत गायकवाड याने त्याची प्रेयसी प्रिया सिंग हिला केलेल्या मारहाण आणि अंगावर गाडी घातल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी अश्वजीत गायकवाड याच्यासह त्याचे साथीदार रोमन पाटील आणि सागर शेडगे यांना अटक केली आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ आणि लँड रोव्हर डिफेंडर गाडी देखील तपासासाठी ताब्यात घेण्यात आली.


हिवाळी अधिवेशनात मुद्दा उपस्थित आणि मग कारवाई


प्रिया या महिलेवर हल्ला झाल्यानंतर तिने या प्रकरणात सरकारकडे मदत मागितली. हे प्रकरण विरोधकांनी हिवाळी अधिवेशनात उपस्थित केल्यानंतर या संदर्भात एक एसआयटी स्थापन करण्यात आलं. त्यानंतर पुढील कारवाई करत पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. मात्र प्रश्न असा उपस्थित केला गेला की हा मुद्दा अधिवेशनात उपस्थित केल्यानंतरच का लक्ष दिलं गेलं?


ठाणे पोलीस आयुक्तांनी याप्रकरणी तपास करण्यासाठी पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन केली. एसआयटीकडून या प्रकरणी साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात असून फॉरेन्सिक पुरावे गोळा केले जात आहेत. आतापर्यंत या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आलेला आहे. कासारवडवली पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.


आज या तिघा आरोपींना ठाणे न्यायालयात हजर करण्यात आलेलं असून पुढील कोठडीसाठी मागणी करण्यात आलेली आहे. मात्र या प्रकरणात खरी सत्यता का आहे हे पुढील तपासात नक्कीच निष्पन्न होणार आहे.


काय आहे प्रकरण?


प्रिया सिंह यांच्याबरोबर गेल्या साडेचार वर्षांपासून अश्वजीत गायकवाड यांचे प्रेमसंबंध होते. मात्र दोघांच्या वाद झाल्याने तिला गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न अश्वजीत गायकवाडसह त्याच्या दोन्ही मित्रांनी केल्याचा आरोप पीडित महिला प्रिया सिंग यांनी केला होता. 


सध्या प्रिया सिंग यांचा खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणात वापरण्यात आलेल्या रेंज रोवर डिफेंडर आणि स्कॉर्पिओ गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. तर या प्रकरणात सकल चौकशी डीसीपी अमरसिंग जाधव परिमंड-5 सह कासारवडवली पोलीस करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


पंचायत समितीच्या माजी अधिकाऱ्याने एकाचे हात कापले


दुसरं प्रकरण हे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड या ठिकाणी घडलं असून माजी पंचायत अधिकाऱ्याने तलवारीने एका व्यक्तीचे हात कापले आहे. मुंबईपासून 75 किमी अंतरावर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एका गावात मुरबाड पंचायत समितीचे माजी सभापती आणि त्याच्या दोन साथीदारांनी शुक्रवारी एका व्यक्तीचे हात तलवारीने कापले.


या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे, तर मुख्य आरोपी श्रीकांत धुमाळ आणि दुसरा साथीदार फरारी आहेत. सुशील भोईर या व्यक्तीचे हात कापले असून त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. धुमाळची नोकरी सोडण्यापूर्वी तो बाउन्सर म्हणून कामाला होता. धुमाळला पोलीस अजून का अटक करत नाहीत, त्यामध्ये काही राजकारण आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. 


आता या सर्व प्रकरणानंतर जी बाब समोर येते ती म्हणजे वाढणारी गुन्हेगारी आणि सामान्य माणसाची सुरक्षा. पोलिसांचे हात बांधलेले आहेत किंवा या आरोपींना कोणी पाठीशी घालत आहे का असा सवाल विचारला जात आहे. असं जर गुन्हेगारी वाढत असली तर सामान्य माणसांनी जगायचा तरी कसं असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.


ही बातमी वाचा: