Bribe Case : चांदीची अंगठी लाच म्हणून घेणं पडलं महाग! कुडाळ नगरपंचायतीचा स्वच्छता निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
Kudal Nagar Panchayat Bribe Case: कुडाळ येथे ना हरकत दाखल्यासाठी १,२०० रुपयांची चांदीची अंगठी लाच स्वीकारणाऱ्या स्वच्छता निरीक्षकाला एसीबीने रंगेहात पकडले.

Kudal ACB Action News : नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला 'ना हरकत दाखला' (NOC) देण्याच्या मोबदल्यात १,२०० रुपये किमतीची चांदीची अंगठी लाच म्हणून मागणाऱ्या कुडाळ नगरपंचायतीच्या स्वच्छता निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सापळा रचून रंगेहात ताब्यात घेतले आहे. पांडुरंग वासुदेव नाटेकर असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे. एसीबीच्या या धडक कारवाईमुळे कुडाळ नगरपंचायत प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
Bribe For NOC : 'पदमगड ज्वेलर्स'च्या ना हरकत दाखल्यासाठी लाच
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने कुडाळ येथे 'पदमगड ज्वेलर्स' नावाचा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी नगरपंचायतीकडे ना हरकत दाखल्यासाठी अर्ज केला होता. हा दाखला मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात स्वच्छता निरीक्षक पांडुरंग नाटेकर यांनी १,२०० रुपये किमतीची नवीन खडा असलेली चांदीची अंगठी लाच म्हणून मागितली होती.
मात्र, तक्रारदाराची लाच देण्याची अजिबात इच्छा नसल्याने त्यांनी याप्रकरणी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार नोंदवली.
Evidence Destruction Attempt : पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न फसला
तक्रारीच्या आधारे एसीबीच्या पथकाने कुडाळ नगरपंचायत परिसरात सापळा रचला. लाचेची अंगठी स्वीकारताच एसीबीचे पथक समोर आले. पोलिसांना पाहताच संशयित पांडुरंग नाटेकर यांनी स्वतःला वाचवण्यासाठी ती अंगठी लपवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, लाचेच्या वस्तू हाताळताना लावली जाणारी अँथ्रोसिन पावडर नाटेकर यांच्या हातावर स्पष्टपणे दिसून आल्याने, एसीबीच्या पथकाने त्यांना तत्काळ ताब्यात घेतले.
Case Registered Under BNS : कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी संशयित पांडुरंग नाटेकर यांच्याविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात (Kudal Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारणा २०१८) चे कलम ७ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २३८ (पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारी कामासाठी लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिला आहे.
ही बातमी वाचा:





















