मुंबई : मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं केलेल्या कारवाई दरम्यान लोकांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही टोळी एचपी गॅसची एजन्सी मिळवून देण्याची बतावणी करून बनावट वेबसाइट बनवून त्याद्वारे विविध राज्यातील लोकांची फसवणूक करत होती. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली आहे. यामध्ये पाच पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.


देशभरातील 10 हजार नागरिकांना या टोळीनं लुबाडल्याचं तपासादरम्यान निष्पन्न झालं आहे. या आरोपींनी वेबसाइटवरून देशातील वेगळ्या राज्यातील नागरिकांना गॅस एजन्सी देण्याचे अमिष दाखवून अनेकांनी फसवणूक केली. बिहार ,पश्चिम बंगाल राज्यातून हे रॅकेट चालवण्यात येत असल्याचं मुंबई पोलिसांच्या सायबर सेलला माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी यासंदर्भात कारवाई केली आहे. गॅस एजन्सीच्या नावाखाली आरोपी इच्छुक नागरिकांना बनावट वेबसाईटवर नोंदणी करण्यासाठी ई-मेलद्वारे बनावट बनवण्यात आलेली कागदपत्र पाठवत होते. यानंतर व्हॉट्सअॅपद्वारे चॅटिंग करून वेगवेगळी आमिषे दाखवून आरोपी नागरिकांकडून लाखो रुपये उकळत होते. आतापर्यंत या आरोपींनी देशभरात 10531 नागरिकांना 10 कोटी 13 लाख रुपयांचा चुना लावल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. बनावट पद्धतीने बनवण्यात आलेल्या वेबसाईटवर लोकांचा विश्वास बसावा म्हणून बजाज फायनांस, बजाज इन्स्टंट लोन, पेट्रोल पंप डीलरशिप, नापतोल, रिलायन्स टॉवर यांसारख्या बनावट जाहिराती देखील ही टोळी चालवत होती.


पाहा व्हिडीओ : एचपी गॅस एजन्सी मिळवून देण्याचं आमिष, देशातील 10 हजार नागरिकांची फसवणूक



सदर आरोपींनी htpp://Lpgvitrakchayan.net आणि htpp://allindaidelearship.in या बनावट वेबसाईट बनवल्या होत्या. 2018 पासून ही टोळी कार्यरत होती. या टोळीने अशा तब्बल 125 बनावट वेबसाईट बनवल्या आहेत. त्यापैकी काही वेबसाईट अजूनही अॅक्टिव्ह आहेत. इतर बनावट वेबसाईटद्वारे फसवणूक केल्याप्रकरणी तपास सुरु आहे. याप्रकरणी 6 जणांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं बिहार, वेस्ट बंगाल आणि रत्नागिरीमधून आरोपींना ताब्यात घेतलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :