मुंबई : तुम्ही इन्स्टाग्राम कॉपीराईटचे उल्लंघन केले आहे असा मेल किंवा मॅसेज तुम्हाला आला असेल आणि त्यासोबतच एक लिंक आली असेल तर त्याची सूचना तात्काळ पोलिसांना द्या. चुकून पण त्या लिंकवर क्लिक करु नका नाही तर तुमची फसवणूक झालीच म्हणून समजा. सोशल मीडियात फेसबुक आणि ट्विटरनंतर नंबर लागतो ते इन्स्टाग्रामचा. जे जे ट्विटर आणि फेसबुक वापरतात ते हमखास इन्स्टाग्राम वापरतात. सेलिब्रिटी तर एकवेळ फेसबुक वापरणार नाहीत पण सेलिब्रिटींचे इन्स्टाग्राम अकाऊंट असतेच.


टिकटॉक बंद झाल्यापासून इन्स्टाग्रामचे युजर्स वाढलेत म्हणून की काय आता हॅकर्सनी आपला मोर्चा इन्स्टाग्रामकडे वळवलाय. कारण महाराष्ट्र सायबर सेलने एक इशारा जारी केलाय. त्यानुसार तुम्ही इन्स्टाग्रामच्या कॉपीराईट नियमांचे उल्लंघन केले आहे असा मेल किंवा मॅसेज हॅकर्स इन्स्टाग्राम युजर्सना पाठवत आहेत. त्या भीतीपोटी इन्स्टाग्राम युजर्स त्या मेल किंवा मॅसेजला रिप्लाय करतात आणि स्वत:ची फसवणूक करुन घेत असल्याचं समोर येत आहे.. कारण त्या मेल किंवा मॅसेजमध्ये असलेली लिंक किंवा विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरातून तुमचा इन्स्टाग्रामचा पासवर्ड हॅकरला कळतो तसच तो तुमचा खाजगी डेटा आणि बॅंकेची माहिती चोरून तुमची फसवणूक करतो.


हा प्रकार घडलाय अभिनेत्री अमिषा पटेल सोबत. 4 जानेवारीला अमिषाच्या इनस्टाग्राम अकाऊंटवर Account will be suspended within 24 hours for violating Instagram’s Copyright Law” हा मॅसेज आला होता. हा फिशिंग प्रकारचा सायबर गुन्हा आहे असे प्रथमदर्शनी भासत होते. कारण हा इन्स्टाग्रामकडूनच आल्याचे भासविण्यात आले होते .तसेच मेसेज बरोबर CopyrightObjectionForm असा मॅसेज लिहून एक लिंक पण देण्यात आली होती. या लिंकवर अमिषा पटेलने घाबरून क्लिक केले व तिला एका तोतया इन्स्टाग्राम वेबसाईटवर डायरेक्ट केले गेले व लगेच तिचे इन्स्टाग्राम अकाउंट लॉक झाले.


महाराष्ट्र सायबरने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अमिषाचे अकाउंट पुनर्जीवित करण्यासाठी तिची परवानगी घेतली व तात्काळ तपास सुरु केला. हॅकरने ते अकाउंट लॉक केले होते व त्यामधील पोस्ट्स डिलीट केल्या होत्या. तपास करताना असे निदर्शनास आले की मेसेजमध्ये दिलेली लिंक हि एका नेदरलॅंडमधील तर IP ADDRESS हा तुर्कस्थान मधील होता. या वरून सदर गुन्ह्याचे गांभीर्य आणि किचकटपणा समोर आला. या गुन्ह्याचे गंभीर परिणाम होऊ शकतो याचा विचार करून व पुढील परिणाम टाळण्यासाठी महाराष्ट्र सायबर सेलची टीम हॅकरचा शोध घेवू लागली.


त्यांनी लगेच इंस्टाग्रामच्या नोडल ऑफिसला संपर्क करून पाठपुरावा करून अकाउंट काही वेळातच रिकव्हर करून दिले. अशाच प्रकारची घटना अभिनेते शरद केळकर यांच्याबाबत देखील घडली होती. त्याही वेळेस महाराष्ट्र सायबर सेलने शरद केळकर यांचे अकाऊंट रिकव्हर करून दिले होते. या जलद व योग्य कारवाई निमित्त तपास करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना विशेष पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र सायबर सेल यशस्वी यादव यांनी रुपये 10 हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे सोबतच नेटीजन्सना आवाहन देखील केलं आहे.


याआधी बॅंक खात्यासंबंधी OTPआणि लिंक देवून नागरिकांची फसवणूक केली जायची आणि आता सोशल मीडिया अकाऊंट हॅक करुन फसवणूक केली जात आहे. या पासून स्वत:चे सरंक्षण करुन घेण्यासाठी एकच पर्याय आहे तो म्हणजे बॅंकांच्या आणि पोलिसांच्या सूचनेचे तंतोतंत पालन करणे. कारण कोणतीही बॅंक किंवा सोशल मीडिया तुम्हाला कोणताही मॅसेज किंवा लिंक पाठवून तुमची खाजगी माहिती विचारत नाही.