मुंबई : ऑनलाइन फ्रॉडद्वारे लोकांना फसवणाऱ्या एका नायजेरियन महिलेला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ही महिला आपल्या टोळीसोबत मिळून श्रीमंत लोकांना हेरून त्यांची फसवणूक करायची. अमेरिकेची नागरिक असून रशियामध्ये पायलेट असल्याचं भासवून  लग्नाचे आमिष दाखवल जायचे. महागडे भेटवस्तू पाठवली आहे आणि कस्टम ड्युटी भरून ती वस्तू घेण्यात यावी असे सांगून लाखो रुपयांची लूट या टोळीकडून केली जात होती.


ऑनलाईन फ्रॉड करून लोकांना लुबाडणाऱ्या परदेशी महिलेला पोलीसांनी अटक केली आहे. ऑनलाइन फ्रॉडद्वारे लोकांना लाखो रुपयांचा चुना लावणाऱ्या एका टोळीची ही महिला सक्रिय सदस्य आहे. दिल्लीमध्ये बसून ही टोळी देशाच्या विविध भागांमध्ये फसवणूक करत होती. मात्र मुंबईमध्ये राहणाऱ्या एका महिलेची फसवणूक या टोळीने केली आणि मुंबई पोलीसांनी ही टोळी उद्ध्वस्त केली. "ANDREA OLIVIERA" या नावाने इंस्टाग्रामवर खोटे अकाउंट बनवून मुंबईत राहणार्‍या महिलेशी मैत्री केली आणि लग्नाचे आमिष दाखवून तिच्या कडून 17 लाख 22 हजार 150 लुबाडले.


वीबी नगर पोलीसांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ गुन्हा दाखल करत युद्धपातळीवर तपास सुरू केला. दिल्लीतून फसवणूक झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. ज्याच्या नंतर विबी नगर पोलीस स्टेशनच एक पथक दिल्लीला रवाना झालं. पोलीसांनी दिल्लीतील गुरुनानक नगर jacinta owokonu ofana (वय 26) या नायजेरियन महिलेला अटक केली. तिच्याकडून nigeria आणि sierra leone या दोन देशाचे पासपोर्ट, 9 मोबाईल, 6 अंतरराष्ट्रीय सीमकार्ड, 6 भारतीय सिमकार्ड, काही बँकांचे कार्ड आदी वस्तू जप्त केल्या आहेत. तर महिलेचा दुसरा साथीदार diaby amara (वय 31) हा फरार झाला. मात्र त्याच्या घरातून पोलीसांना 2 लॅपटॉप, 6 मोबाईल, 3 आंतरराष्ट्रीय सिमकार्ड, 1 भारतीय सिमकार्ड,1 पासपोर्ट, विविध बँकांचे डेबिट कार्ड पोलीसांच्या हाती लागल्या आहेत.


पोलीसांना खात्री आहे की, ऑनलाईनफ्रॉडमध्ये फक्त हे दोघेच नसून एक मोठी टोळी यामागे सक्रिय असू शकते. ज्याचा तपास आता पोलीसांकडून केला जात आहे. तसेच पोलीसांनी लोकांना सुद्धा आव्हान केलं आहे की, ज्यांच्या सोबत अशी फसवणूक झाली असेल त्यांनी पोलिस स्टेशनला येऊन तक्रार द्यावी. जेणेकरून अशा भामट्यांना वेळेस आळा घालण्यास पोलिसांना मदत होईल.


ही कारवाई ज्ञानेश्वर चव्हाण (अपर पोलीस आयुक्त मध्यप्रदेश विभाग), प्रणय अशोक (पोलीस उपायुक्त परिमंडळ 5), सुरेश जाधव (सहायक पोलीस आयुक्त), राजेश पवार (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वी बी नगर पोलीस ठाणे) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय क्षीरसागर, पोलीस उप निरीक्षक जितेंद्र सपकाळे,महिला पोलीस उप निरीक्षक अंबिका घस्ते, पोलीस नाईक प्रकाश राजे, संजय होलकर,मनोज राजे, पोलीस शिपाई पवार, विनोद पवार आणि सायबर एक्सपर्ट शुभम सिंग या पथकाद्वारे करण्यात आली आहे.


संबंधित बातम्या :