Gondia News गोंदिया : गोंदिया शहरातील प्रॉपर्टी डीलर महेश दखने (वय 35 वर्ष) यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला चढवला होता. यात महेश दखने गंभीर जखमी झाले होते. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली असून संपूर्ण गोंदिया (Gondia News) शहर या हत्येच्या घटनेने हादरलाय. ही घटना रविवारी किसान चौक छोटा गोंदिया येथे घडली होती. गोंदिया शहरातील महेश दखने हे आपल्या टू व्हीलर गाडीने जात असतांना अज्ञात हल्लेखोरांनी पाठलाग करत डोक्याच्या मागच्या बाजूला हातोडा, कुऱ्हाडी, तलवार आदी हत्याराने वार केले होते.
गंभीर जखमी महेश दखने यांना बेशुद्ध अवस्थेत डॉ. बाहेकर यांच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, बराच वेळ पडून राहिल्याने आणि जास्त रक्तस्त्राव झाल्याने महेश दखणे यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच अखेर आज सकाळी त्यांचा मृत्यु झालाय. तर या घटनेची नोंद गोंदिया शहर पोलिसांनी घेतली असून आरोपींच्या शोधात तीन पोलीस पथक रवाना झाली आहेत.
अज्ञात हल्लेखोरांच्या हल्ल्यात जखमी प्रॉपर्टी डीलरचा उपचरादरम्यान मृत्यु
गोंदिया शहरातील किसान चौक (छोटा गोंदिया) येथे जान्हवी ऑटो रिपेअरिंग सेंटर जवळ रविवारच्या सकाळी 9.45 वाजताच्या सुमारास शहरातील प्रॉपर्टी डीलर महेश दखने यांच्यावर हल्ला करण्यात आला. वर्दळीच्या रस्त्यावर अचानक झालेला आरडाओरडा ऐकून काही लोक मारेकऱ्यांच्या मागे धावले, मात्र हल्लेखोर तोपर्यंत पळून गेले होते. दरम्यान बघ्यांची एकच गर्दी जमली पण त्यांना तात्काळ दवाखान्यात नेण्याची तसदी कोणी घेतली नाही.
मारेकरी अद्याप फरारच
दरम्यान वाचन खंदारे नामक एका व्यक्तीने फोन करून या प्रकरणाची माहिती माजी नगरसेवक लोकेश कल्लू यादव यांना दिली. त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून गंभीर जखमी महेश दखणे यांना बेशुद्ध अवस्थेत डॉ. बहेकर यांच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, अतिरक्तस्त्राव झाल्याने आणि गंभीर जखमी असल्याने आज अखेर उपचार दरम्यान महेश दखने यांचा मृत्यु झालाय. मात्र, दुसरीकडे या हल्ल्यातील मारेकरी अद्याप फरारच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या मारेकऱ्यांचा शोध घेणे आता पोलीसांपुढे आव्हान असणार आहे. तर गोंदिया शहर पोलिसांनी पथके तयार करून पुढील तपास सुरू केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या