पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) 2024 स्पर्धेत आठव्या दिवशी पहिल्या लढतीत दिग्विजय पाटील(नाबाद 48) व दिग्विजय जाधव(नाबाद 20)यांनी केलेल्या सयंमपूर्ण अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर छत्रपती संभाजी किंग्स संघाने 4 एस पुणेरी बाप्पा संघाचा 7 गडी राखून पराभव करत तिसरा विजय मिळवला. 


गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत विजयासाठी छत्रपती संभाजी किंग्स संघाला 145 धावांचे आव्हान होते. सलामवीर सौरभ नवले 6 धावांवर तंबूत परतला. ओमकार खाटपे(30धावा) व ओम भोसले(27 धावा)यांनी दुसऱ्या विकेटसाठी 34 चेंडूत 50 धावांची भागीदारी करून संघाच्या डावाला आकार दिला. आठव्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर ओम भोसले 27 धावांवर झेल बाद झाला. रोशन वाघसरेने त्याचा बळी घेत अडसर दुर केला. त्यानंतर दिग्विजय पाटीलने 32 चेंडूत नाबाद 48 धावांची संयमी खेळी केली. त्याने ९चौकार मारले. दिग्विजय पाटील व ओमकार खाटपे(30धावा)यांनी चौथ्या विकेटसाठी 38 चेंडूत 52 धावांची भागीदारी करून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 






तत्पूर्वी, 4 एस पुणेरी बाप्पा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. छत्रपती संभाजी किंग्सच्या यतीन मंगवाणी(2-28), आनंद ठेंगे(1-23), हितेश वाळुंज(1-30)यांनी केलेल्या अचूक गोलंदाजीपुढे 4 एस पुणेरी बाप्पा संघाला 20 षटकात 5 बाद 145 धावापर्यंत मजल मारली. पवन शहाने 43 चेंडूत 46 धावांची खेळी करून संघाला सुरेख सुरुवात करून दिली. त्याने 3 चौकार व 2 षटकार मारले. पण एकाबाजूने शुभम तैस्वाल(8), अभिमन्यू जाधव(7)हे झटपट बाद झाले. त्यानंतर यश क्षीरसागर 15, सुरज शिंदे नाबाद 15 यांनी धावा केल्या. 






निकाल: साखळी फेरी:
4 एस पुणेरी बाप्पा: 20 षटकात 5 बाद 145 धावा(पवन शहा 46 (43,3x4,2x6), साहिल औताडे 39(21,2x4,3x6), यश क्षीरसागर 15, सुरज शिंदे नाबाद 15, यतीन मंगवाणी 2-28, आनंद ठेंगे 1-23, हितेश वाळुंज 1-30) पराभुत वि.छत्रपती संभाजी किंग्स: 18.1 षटकात 3 बाद 148 धावा(दिग्विजय पाटील नाबाद 48(32,9x4), ओमकार खाटपे 30(28,2x4,1x6), दिग्विजय जाधव नाबाद 20, ओम भोसले 27, सोहम जमाले 1-27, रोशन वाघसरे 1-29);सामनावीर - दिग्विजय पाटील;