Gondia News : इंटर्नशिप करणाऱ्या नर्सिंगच्या विद्यार्थिनींना गावातील टवाळखोर मुलांनी शिवीगाळ केल्याची घटना उजेडात आली आहे. शिवाय या टवाळखोर तरुणांनी लिव्हिंग क्वार्टरवर दगड (Crime News) देखील भिरकावले आहे. गोंदिया तालुक्यातील भानपुर प्राथमिक आरोग्य केंद्रातील हा प्रकार असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गंगाझरी पोलिसांत रात्री(8 मार्च) उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून टवाळखोरी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
पुढे आलेल्या माहितीनुसार, गोंदियाच्या भानपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गोंदिया नर्सिंग कॉलेजच्या 19 विद्यार्थिनी गेल्या एक महिन्यापासून इंटर्नशिप करत आहेत. रात्री (8 मार्च) या विद्यार्थिनी आपल्या लिव्हिंग क्वार्टरकडे जात असताना गावातील काही मुलांनी त्या विद्यार्थिनींना अश्लील भाषेत शिवीगाळ करत द्विअर्थ शब्दांचा वापर केला आणि त्यानंतर लिव्हिंग क्वार्टरकडे धाव घेतली व दगड भिरकावले. त्यानंतर या सर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींनी गंगाझरी पोलीस स्टेशन गाठत घटनेची तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी कलम 296, 329, 351(2) दाखल अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर या प्रकरणी 3 तरूणांना पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतले आहे.
गॅस कटरच्या सहाय्याने 15 लोखंडी खांबाची चोरी
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक ठिकाणी सध्या इलेक्ट्रिक खांब लावण्याचे काम सुरू आहे. अशातच इलेक्ट्रिक पोल हे गॅस कटरने कापून नेल्याची तक्रार तिरोडा पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली होती. या घटनेच्या तपास करत असताना सीसीटीव्ही व इतर संसाधनाचा वापर केला असता या प्रकरणात नागपुरातील तीन आरोपींना अटक करण्यात आली. या चोरट्यांनी 15 पोल किंमत 1,25,000/- रु चे गॅस कटरने कापुन नेले होते. याप्रकरणी तिरोडा पोलिसांनी बसंतलाल साहु, अशिषकुमार साहु, सुंदरलाल साहु तिघेही रा. नागपूर यांना पोलिसांनी अटक केली आहे.
लोकेश उर्फ कल्लू यादव गोळीबार प्रकरणी आणखी 6 आरोपींना बेड्या
गोंदिया नगरपरिषदेचे माजी नगरसेवक लोकेश उर्फ कल्लू यादव यांच्यावर 11 जानेवारी 2024 ला गोंदिया शहरातील यादव चौक परिसरामध्ये गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये लोकेश यादव गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर या प्रकरणात 9 आरोपींना गोंदिया पोलिसांनी अटक केली होती. मात्र, या घटनेचा मुख्य सूत्रधार प्रशांत मेश्राम हा फरार होता. 4 मार्च 2025 ला प्रशांत मेश्राम याला पोलिसांनी अटक केल्यानंतर आता या प्रकरणात पुन्हा 6 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये दोन आरोपी हे मध्यप्रदेश राज्यातील आहेत. निकलेश मेश्राम, हर्ष गजभिये, उत्तम गेडाम, चेतेश कटरे चौघे राहणार गोंदिया व कुलदीप खरवडे, खिलेंद्र धुर्वे राहणार मध्यप्रदेश अशी नव्याने अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.
हे ही वाचा