Nashik Crime : गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटनेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. आता पुन्हा एकदा नाशिक शहर खुनाच्या घटनेने हादरले आहे. संत कबीरनगर (Sant Kabir Nagar) येथे शनिवारी (दि. 08) रात्री एकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. अरुण बंडी असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अरुण बंडी याचे काही युवकांसोबत जुने वाद होते. त्याला शनिवारी रात्री चार जणांच्या टोळक्याने अडवून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच दंगा पथक तसेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
मारेकरी सराईत गुन्हेगार
या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. शनिवारी रात्री याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गंगापूर पोलिसांनी रात्री दोन हल्लेखोरांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत असून फरार संशयितांचा शोध घेतला जात आहे. मारेकरी सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, शहरात गेल्या काही दिवसांपासून टोळक्यांचा मोठा सुळसुळाट झाला असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
नोकरीचे आमिष दाखवून गंडा
दरम्यान, परिचय असल्याचा फायदा घेत संशयित कुटुंबाने एका व्यक्तिकडून उपचाराच्या नावे सात लाख रुपये उकळले असता, ते परत मागितल्यानंतर संशयितांनी या व्यक्तिच्या नातलगास रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून पुन्हा सात लाख रुपये घेत तब्बल चौदा लाख रुपये घेऊन गंडा घातला आहे. या प्रकरणी संशयित राहुल सुधीर गांगुर्डे, सुधीर गेणूजी गांगुर्डे व निलम राहुल गांगुर्डे या संशयितांवर गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील शंकर कदम (40, रा. सिरीन मेडॉज, गंगापूर रोड, नाशिक) यांनी फिर्याद नोंदविली आहे.1 सप्टेंबर 2022 ते एप्रिल 2023 पर्यंत सम्राट ट्रॉपिकानो येथे असताना वरील संशयितांनी ओळख असल्याचा फायदा घेऊन त्यांच्याकडून औषधोपचारार्थ सात लाख रुपये घेतले. कालांतराने हे पैसे कदम यांनी परत मागितले असता संशयितांनी पैसे परत न करता, कदम यांना त्यांचा शालक निशांत तायडे यांना रेल्वेत नोकरी लावून देतो असे सांगितले. त्यासाठी पुन्हा सात लाख रुपये घेतले. मात्र, मागील सात लाख रुपये व नोकरीदेखील मिळाली नसल्याने त्यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली आहे.
आणखी वाचा