Gondia News : परराज्यातून रोजगारासाठी आलेल्या तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही खळबळजनक घटना गोंदिया (Gondiya) जिल्ह्यातील मूर्री पोलीस स्टेशन हद्दीत 23 जानेवारीच्या मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. गोंदियाच्या मुर्री गावात असलेल्या राईस मिलमध्ये मृतक तरुण रोजगारासाठी आलेला होता. दरम्यान, रात्रीच्या सुमारास अज्ञात इसमानी त्या तरुणाची दगडाने ठेचून  (Gondia Crime News) निर्घृण हत्या केली. या खळबळजनक घटनेमुळे परिसरात एकच दहशत निर्माण झाली आहे.


तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या


घटनेची माहिती आज सकाळी पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळ गाठत प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मात्र, ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली आणि हत्या कुणी केली, याबाबत अद्याप कुठलीही माहिती समोर आली नसून गोंदिया पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, गेल्या 15 दिवसात ही सलग दुसरी हत्या असल्याने गोंदिया जिल्ह्यात गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले असल्याचे चित्र आहे. 


हत्येच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ


गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून हत्येच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक घटना काल 23 जानेवारीच्या मध्यरात्री घडली. बिहार राज्यातून रोजगारासाठी गोंदियात आलेल्या तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना गोंदिया शहरालगत असलेल्या कुडवा येथे घडली होती. ज्यामध्ये चहाच्या टपरीवरील उधारीच्या पैशातून एकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बापलेकासह अन्य एकाला ताब्यात घेतले होते.


याशिवाय, 11 जानेवारीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गोंदिया जिल्हा प्रमुख पंकज यादव यांचे छोटे बंधू आणि माजी नगरसेवक लोकेश यादव यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या घटना ताज्या असतानाच आता परत घडलेल्या या हत्येच्या घटनेमुळे गुन्हेगारीने जिल्ह्यात परत एकदा डोके वर काढले असल्याचे चित्र आहे. अद्याप या हत्येमागील कारण आणि आरोपींचा शोध पोलीस घेत आहे. पोलिसांनी मृतदेह शविच्छेदन करण्याकरिता पाठवला असून या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहे. 


मास्टरमाईंड असलेला प्रशांत मेश्राम अद्याप फरार


माजी नगरसेवक लोकेश यादव यांच्यावर 11 जानेवारीला गोळीबार करण्यात आला होता. जुन्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून हा गोळीबार झाला असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. तर या प्रकारणतील  मुख्य आरोपी आणि गोळीबारातील मास्टर माईंड असलेला प्रशांत मेश्राम अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे पोलीस त्यांचा शोध घेत आहे. या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गोंदिया जिल्हा प्रमुख पंकज यादव यांनी पत्रकार परिषद घेत, गोंदिया शहरांमध्ये सुरू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे आणि गोंदिया जिल्ह्यात होणारी गुन्हेगारी कमी व्हावी, अशी मागणी पत्रकार परिषदेतून केली होती. 


महत्वाच्या इतर बातम्या :