(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur News : प्रेमसंबंध तोडल्यामुळे ठार मारलेल्या मुलीला तब्बल 6 वर्षाने न्याय; जन्मदिनी आरोपीला जन्मठेप
Nagpur Crime News : प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून एक युवतीची हत्या करणाऱ्या आरोपीला तब्बल 6 वर्षांनंतर जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावण्यात आली आहे.
नागपूर: प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून एक युवतीची हत्या (Murder) करणाऱ्या आरोपीला तब्बल 6 वर्षांनंतर जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावण्यात आली आहे. योगायोग म्हणजे न्यायालयाने मृत युवतीच्या जन्मदिनीच हा निकाल सुनावण्यात आला आहे. सत्र न्यायालयाचे न्या. एस. एम. कणकदंडे यांनी आरोपीला जन्मठेपेच्या शिक्षेसह दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच हा दंड न भरल्यास आरोपीला तीन महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रेमभंगातून आरोपीचे टोकाचे पाऊल
25 वर्षीय रोहित मनोहर हेमनानी उर्फ भोलानी असे या आरोपीचे नाव असून, तो नागपुरातील खामला सिंधी कॉलनीत भाडे तत्वावरील घरात राहत होता. तर मृत मुलगी लक्ष्मीनगर येथे मामाच्या घरी राहत होती. प्रतापनगरातील महाविद्यालयात शिक्षण घेत होती. आरोपी रोहितचे मुलीवर प्रेम होते. दरम्यान यांच्यात ओळख निर्माण झाली आणि ओळखीचे रूपांतर नंतर प्रेम संबंधात झाले. नंतर या दोघांमध्ये वाद निर्माण झाला आणि हा वाद विकोपाला गेल्याने मुलीने या प्रेमसंबंधातून स्वतःची सुटका करून घेतली. मात्र ही बाब आरोपी रोहितला मान्य नव्हती. त्याने मुलीला आपल्याशी प्रेम संबंध कायम ठेवण्यासाठी बळजबरी केली. परिणामी आरोपी चिडून तिला शिवीगाळ आणि धमक्या देखील देऊ लागला होता. त्याचे असे बेभान झाल्याचे पाहून मुलीने रोहित पासून सगळीकडून संपर्क तोंडाला. त्यामुळे आरोपी आधिक चिडला.
कट्यारीने केली हत्या प्रेयसीची हत्या
आपल्याला आपल्या प्रेयसीने नाकारले ही गोष्ट असह्य झाल्याच्या रागातून आपण देखील या गोष्टीच्या बदला घेत जाब विचारला पाहिजे. अशा विचारात असलेला आरोपी कायम मुलीचा शोध घेत होता. 1 जुलै 2018 च्या रात्री मुलगी आपल्या मामाच्या कार्यालयात असल्याची बाब आरोपीला माहिती झाली. त्यावरून तो मुलीला भेटण्यासाठी तिच्या मामाच्या कार्यालयात गेला. मुलगी भेटायला आल्यानंतर त्याने प्रेमसंबंध का तोडले, अशी विचारणा करून हुज्जत घालायला सुरुवात केली. मुलीने त्याच्यासोबत कुठलाही संबंध ठेवायचे नाही, असे स्पष्टपणे सांगितले. मात्र तो काही केल्या ऐकूण घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. काहीही केल्या आपण आपले प्रेम मिळवायचे अन्यथा तीचा जीव घ्यायचा असा विचार आरोपीने केला होता. त्यासाठी त्याने सोबत कंबरेत लपवून कट्यार देखील आणली होती. नंतर आरोपीने कुठलाही विचार न करता कट्यार बाहेर काढून मुलीच्या शरीरावर जागोजागी वार करत तीला गंभीर जखमी केले. या घटनेत तीचा 20 सप्टेंबर रोजी एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. हत्येच्या वेळी मृत मुलगी 19 वर्षाची होती.
6 वर्षांनंतर जन्मठेपेची शिक्षा
मुलीवर हल्ला केल्यानंतर आरोपी फरार झाला होता. त्यानंतर बजाजनगर पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता तो 3 जुलै रोजी अमरावती जिल्ह्यातील बडनेरा रेल्वेस्थानक परिसरातून आढळून आला. त्यानंतर आरोपीला ताब्यात घेत तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक डी. ए. लांडगे यांनी प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला होता. तर न्यायालयात सरकारच्या वतीने अॅड. माधुरी मोटघरे यांनी कामकाज पाहत विविध ठोस पुराव्यांच्या आधारे आरोपीवरील हत्येचा गुन्हा सिद्ध केला. त्यानंतर आता आरोपीला तब्बल 6 वर्षांनंतर जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावण्यात आली आहे.