पुणे : आपल्या माजलेपणाचे दर्शन दाखवत दिवसाढवळ्या भर रस्त्यावरच लघुशंका करत अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजाचा मित्र भाग्येश नीबजीया पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे. तर गौरव आहुजा मात्र अद्याप फरार आहे. घटनेवेळी भाग्येश नीबजीया हा गौरव आहुजासोबत कारमध्ये होता आणि या दोघांनीही दारू प्यायल्याची माहिती आहे.  


एकीकडे जग महिला दिन साजरा करत असताना दुसरीकडे पुण्याच्या शास्त्रीनगर चौकात भर सकाळी संतापजनक प्रकार घडला. पुण्यात गौरव आहुजा या मद्यधुंद तरूणाने भरचौकात अश्लील प्रकार केला. सिग्नलवर गाडी उभी करून गाडीच्या बाहेर येत त्याने लघुशंका केली. एमएच 12 आरएफ 8419 या रजिस्ट्रेशन नंबरच्या बीएमडब्ल्यू 6 सीरिज या लक्झरी गाडीतून आलेल्या तरूणाने श्रीमंतीचा माज दाखवत, कोणताही विधीनिषेध न बाळगता भर रस्त्यात दिवसाढवळ्या लघूशंका केली. विशेष म्हणजे जाब विचारायला गेलेल्यांसमोर पुन्हा त्याने हे विकृत कृत्य केलं.


आहुजा बाप-लेकाची पार्श्वभूमी गुन्हेगारी 


पुण्यात भर चौकात लघुशंका करणाऱ्या गौरव अहुजाची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. गौरव अहुजावर जुगार आणि अपहरणाचा देखील गुन्हा दाखल आहे. पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्यात 2021 साली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावेळी गौरव अवघ्या 20 वर्षांचा होता. क्रिकेटवर बेटिंग घेणाऱ्या टोळीचा देखील गौरव हा सदस्य आहे.


पुण्यातील कुख्यात गुंड सचिन पोटेच्या नेतृत्वात ही टोळी काम करते. या बेटिंगच्या व्यसनात कॉलेजचे  अनेक तरुण कर्जबाजारीही झाले आहेत. कर्ज फेडण्यासाठी या टोळीने त्या कॉलेज तरुणांना स्वतःच्या घरात चोरी करायला भाग पाडल्याचीही माहिती आहे. ज्यांनी पैसे दिले नाहीत त्या तरुणांचं अपहरण देखील करण्यात येत होतं. एका तरुणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सचिन पोटे, गौरव आहूजा, अजय शिंदे, सुनील मखीजाला अटक केली होती.


दारू प्यायले होते की नाही याची तपासणी होणार


गौरव अहुजा आणि त्याच्यासोबत असलेल्या भाग्येश निबजीया या मित्रावर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी उपद्रव, अश्लील आणि अश्लाघ्य वर्तन, रहदारीस अडथळा निर्माण करणे, अशा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. घटनेवेळी काढण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये बीअरची बाटली दिसत आहे. त्यामुळे गाडीतील दोनही तरुणांनी मद्यप्रशान केले होते की नाही याचीही तपासणी करण्यात येणार आहे.


ही बातमी वाचा: