पुणे: राज्यात उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण झालंय अन् अनेक उद्योजक महाराष्ट्राला पसंती देत असल्याचा दावा सरकार वेळोवेळी करतंय. पण खरंच असं चित्र आहे का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असोत की उपमुख्यमंत्री अजित पवार असोत, गुंडांची भाईगिरी खपवून घेऊ नका असे आदेश त्यांनी दिले होते. तरीही औद्योगिक पट्ट्यात गुंडांची दहशत कायम आहे. पुण्याच्या खेडमध्ये ह्युंदाई कंपनीत दोन गटांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीने यावर शिक्कामोर्तब केलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कार्यक्रमात गुंडांचा बंदोबस्त लावण्याचे आदेश कडक शब्दात दिले. गुंडांचे उपद्रव खपवून घेऊ नका, उद्योगांना पोषक वातावरण तयार करा असं दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्यानंतर उद्योगक्षेत्र भयमुक्त होईल अशी अपेक्षा होती. मात्र महिन्याभराच्या आतच पुण्याच्या खेड तालुक्यात हा राडा झाला.
कंत्राट मिळवण्यावरून राडा
ह्युंदाई कंपनीत कंत्राट मिळवण्यासाठी दोन गटांमध्ये कंपनीच्या गेटवर अशी तुंबळ हाणामारी झाली. लाठ्या-काठ्या, लोखंडी गज, बॉटल अगदी गेटवरील सुरक्षेच्या वस्तूंनी डोकी फोडण्यात आली. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हेच व्हिडीओ पोस्ट करत अनेक गंभीर प्रश्न उभे केले आहेत.
ह्युंदाई कंपनीच्या गेटवर झालेल्या तुंबळ हाणामारी प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे ही दाखल झाले आहेत. या प्रकरणी चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. इतरांचा शोध सुरु आहे. यानिमित्ताने कंत्राट पद्धतीसाठी नियमावलीच्या अधीन कामं देण्याच्या सूचना पोलिसांनी कंपन्यांना दिल्या आहेत.
स्थानिक गुंडाचा वाढता त्रास
परदेशातील अन् परराज्यातील कंपन्या राज्यात आणण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करतंय. मात्र स्थानिक गुंडांचा वाढत्या त्रासाने उद्योजकांमध्ये भीतीचं वातावरण कायम आहे. त्यामुळं गुंडांच्या भाईगिरीचा बंदोबस्त लावण्याची मागणी उद्योजक संघटनांकडून केली जात आहे.
राज्यात परकीय गुंतवणूक वाढवायची असेल तर औद्योगिक पट्ट्यातील गुंडगिरीला मुळासकट उपटून काढण्याची गरज आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी कडक शब्दात पोलिसांना आदेशही दिलेत. तरी घोडं नेमकं आडतंय कुठं? या आकांपर्यंत पोलिस का पोहचत नाहीत? की त्यांना पोहचू दिलं जात नाही? या प्रश्नांची उत्तरं आता पोलिसांना द्यावी लागणार आहेत.
ही बातमी वाचा: