मुंबई : नोकरीत खोट्या, बनावट प्रमाणपत्रांची पूर्तता करुन फसवणूक केल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. विशेष म्हणजे युपीएससीसारख्या परीक्षेतही असा बनाव करुन अधिकारी बनल्याचं प्रकरण काही दिवसांपूर्वीच समोर आलं होतं. त्यामुळे, प्रशासकीय सेवेतील भरतीचा मुद्दा देशभर गाजला, तर माजी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांची सेवाही खंडीत करण्यात आलीय. मात्र, आता चक्क न्यायव्यवस्थेला (court) हादरवरुन टाकणारी घटना समोर आलीय. अहमदाबादमध्ये एका वकिलाने चक्क न्यायाधीश बनून वादग्रस्त जमीनीसंदर्भात निर्णय दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  मॉरिस सैमुअल क्रिश्चियन असं या वकिलाचं नाव असून त्याने चक्क न्यायाधीश असल्याचे सांगत, न्यायालयात खटला चालवून निकालही दिला. सरकारी जमिनींसंदर्भात या महोदयाने न्यायालयीन आदेश जारी केला होता. याप्रकरणी आरोपी मॉरिसला अटक करण्यात आली असून त्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 


गुजरातमध्ये गेल्यावर्षी अनेक बनावट व फसवणुकीच्या घटनांमध्ये एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. याप्रकरणी रजिस्ट्रार हार्दिक देसाई यांनी आरोपी मॉरिस सैमुअल क्रिश्चियन या वकिलाविरुद्ध अहमदाबादच्या कारंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मॉरिसला अटक केल्यानंतर पोलिसांनी घटनेची सखोल चौकशी केली असून मॉरिसने 2019 साली वादग्रस्त सरकारी जमिनींसंदर्भात न्यायालयीन खटला चालवून बनावट आदेश जारी केला होता. हे प्रकरण समोर आल्यानंतर अनेकांनी भुवया उंचावत आश्चर्य व्यक्त केलं आहे. आरोपी मॉरिस सैमुअल क्रिश्चियन याने राखी वासणा परिसरात खोटं न्यायालय उभारलं होतं. या न्यायालयात त्याने वकिल, क्लर्क आणि इतर कर्मचाऱ्यांचीही भूमिका निभावली आहे. तर, या न्यायालयात न्यायाधीश म्हणून जमिनीच्या वादासंदर्भातील खटल्यात निकालही दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी, अहमदाबाद पोलिसांनी कलम 170, 419, 420, 465, 467 आणि 471 अन्वये खटला दाखल केला आहे. दरम्यान, यापूर्वीच आरोपी मॉरिसविरुद्ध मणिनगर पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल आहे.  ज्यामध्ये, कलम 406, 420, 467, 468 आणि 471 अन्वये कारवाई सुरू आहे. आता, न्यायालय प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. 


दरम्यान, यापूर्वीच गुजरातमधील फेस पीएमओ अधिकारी, फेक आयपीएस आणि फेक आयएएस अधिकारी पकडण्यात आले होते. आता, फेक न्यायाधीशालाही पोलिसांनी अटक केल्याने प्रशासकीय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तसेच, अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी होत आहे. 


हेही वाचा


राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी... अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांविरुद्ध उतरवला उमेदवार, टाकला राजकीय डाव