मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी वेगाने सुरू झाली असून उमेदवारांच्या नावांची घोषणा होत आहे. भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर अजित पवारांच्या (Ajit pawar) राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात येत आहे. अजित पवारांनी देवगिरी बंगल्यावर सोमवारी जवळपास 17 जणांना एबी फॉर्मचं वाटप केल्याची माहिती आहे. त्यानंतर, आज ठाण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आणि आमदार जिंतेंद्र आव्हाडांविरुद्ध (Jitendra Awhad) त्यांनी उमेदवार दिला आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघासाठी नजीब मुल्ला यांना तिकीट दिलं आहे. उमेदवार नजीब मुल्ला यांनी अजित पवारांकडून पक्षाचा एबी फॉर्म स्वीकारला. त्यामुळे, ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या लढतींपैकी ही एक लक्षवेधी लढत होणार आहे.


विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून आजपासून उमेवारांची रांग पक्षनेत्यांकडे लागली आहे. एबी फॉर्म घेऊन लवकरात लवकर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार घाई करत आहेत. बड्या नेत्यांच्याही उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तारखा ठरल्या आहेत. तर, एबी फॉर्म मिळताच उमेदवारही अर्ज भरण्याची योजना आखत आहेत. नजीब मुल्ला 28 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार आहेत, तर नजीब मुल्ला यांच्या विरोधातील महाविकास आघाडीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड तारखेला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यामुळे, या मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध अजित पवारांनी मुस्लीम उमेदवार देऊन मोठी राजकीय खेळी केल्यामुळे जितेंद्र आव्हाडांना हे आव्हान ठरणार का, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल. 


कार्यालयाच्या उद्घाटनावेळी वाद


मुंब्राच्या किस्मत कॉलनीत नजिब मुल्ला यांच्या कार्यालयासाठी अजित पवार कळवा-मुंब्रा मतदारसंघात आले होते, त्यावेळी जितेंद्र आव्हाड आणि मुल्ला यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाजी झाली होती. कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून नजीब मुल्ला इच्छुक होते, अखेर अजित पवारांकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, मुल्ला यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी येथील परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळी, अनुचित प्रकार टाळण्यासाठी मुंब्रा पोलीस ठाण्याचे 30 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी आणि दंगल नियंत्रक पथक घटनास्थळी तैनात करण्यात आले होते. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्राच्या विकासासाठी आलेले पैसे खाल्ले आहेत आणि कोणताही विकास कामे केले नाहीत, असा आरोप नजीब मुल्ला यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर केला होता. 


हेही वाचा


मुंडेच वरचढ, जिल्ह्यातील राजकीय घराणेशाहीचा बीड पॅटर्न; 2024 च्या निवडणुकीतही नातीगोतीच